फडणवीसांच्या गावात कायदा बाराच्या भावात!

750

नागपूरमध्ये मुळशी पॅटर्न… त्याने आधी एकाला संपवले… मग गँगने भोजनालयात घुसून घेतला बदला… नागपूरमध्ये मद्य पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार… उपराजधानीत जुन्या वादातून गुंडाची हत्या… नागपूरमधील गुन्हेगारीच्या बातम्या आणि आकडेवारीवर नजर टाकली तर राज्याची उपराजधानी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे गाव गुह्यांची राजधानी झाल्याचे दिसून येते. कारण 2012पासून 2019पर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये खून, बलात्कार व अपहरणाच्या 4 हजार 200हून अधिक गुह्यांची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी एका व्यक्तीचे अपहरण, एक दिवसाआड एक बलात्कार, चार दिवसाला एक खून, सहा दिवसाआड खंडणीच्या एका गुह्याची नोंद होत असल्याचे माहिती अधिकारातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. बारामती येथील सोमेश्वरनगरमधील आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी नागपूर शहर व जिह्यात 2012पासून नोंद झालेले खून, बलात्कार, अपहरण, मारामारी, खंडणी अशा गुह्यांसह गुह्याचा तपास व गुह्यात अटक झालेल्यांची आकडेवारी माहिती अधिकारात मागवली होती. नागपूर शहर गुन्हे शाखेचे जन माहिती अधिकारी व सहाय्यक पोलिस आयुक्त(गुन्हे) सुधीर नंदनवार यांनी 2012पासून 2019 जूनपर्यंतची गुन्हांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार या काळात नागपूरमध्ये 677 खून, 1019 बलात्कार आणि अपहरणाचे 2 हजार 443 गुह्यांची नोंद झाली आहे. त्याशिवाय खंडणीचे 353 आणि मारामारीच्या 240 गुह्यांची नोंद झाली आहे.

2018मध्ये विधानसभेतही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नियम 293 अन्यये चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना नागपूरमध्ये विविध वर्गातील मिळून 25 हजार 558 गुह्यांची घट झाल्याचा दावा केला होता. नागपूरचा सुरक्षितता निर्देशांक वाढला असून नागपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था सुधारण्याठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. पण 2018मध्ये नागपूरमध्ये 72 खून, 158 बलात्कार, 498 अपहरण, 43 मारामारी, व खंडणीच्या 43 गुह्यांची नोंद झाली होती.

2019ला टक्केवारी घटली

नागपूर पोलिसांनी आकडेवारी प्रसिद्ध करून 2018च्या तुलनेत 2019मध्ये गुह्याच्या टक्केवारीत घट झाल्याचा अहवाल सादर केला होता. गुह्यांमध्ये दहा टक्के घट झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला होता. पण माहिती अधिकारातील मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास गुह्यांचे प्रमाण वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या