
आपण एका गाडीत बसू शकलो नाहीत, पण एका स्टेशनवर आलो आहोत अशी मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर मेट्रोच्या अॅक्वालाइन उद्घाटन सोहळ्यात केली. मात्र त्याचवेळेस आम्हाला जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. श्रेय नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून नागपूर मेट्रो अॅक्वालाइनचे तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सीताबर्डी या अॅक्वालाइनला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. मुंबईत व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-प्लागचे उद्घाटन झाले. त्याचवेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये सुरू असलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या कामाचे कौतुक केले होते. यावेळी मंत्रालयात नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम आणि अतुल गाडगीळ उपस्थित होते.
नावामुळे आपुलकी
महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांचा विकास करताना त्यांचा चेहरामोहरा जपला जाईल अशा पद्धतीने कामे झाली पाहिजेत. नागपूर मेट्रोला ‘माझी मेट्रो’ हे नाव दिल्याने त्याविषयी नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. नागरिकांनीदेखील या सुविधांचे संवर्धन करून तिची निगा राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
केंद्राच्या परवानग्या
केंद्र शासनाकडे काही विकासकामांच्या आवश्यक त्या परवानग्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या आवश्यक असून केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या सदस्यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून जनतेला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन करतानाच नागपूर मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.


































































