राधाकृष्ण विखेंच्या विरोधात अशोक विखे उपोषणाला बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली असून 20 मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱयांना एक निवेदन पाठवून अशोक विखे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱयांना उसाचे पैसे मिळावेत, झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी, जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी, मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी ते उपोषण करणार आहेत.

राधाकृष्ण विखेंनी घेतली महाजनांची भेट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यामुळे विखे-पाटील त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे.

सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खुलेआम त्यांचा प्रचार केला. इतकेच नव्हे तर शिर्डीतही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते. याच काळात त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला. त्यांचा राजीनामा पक्षाध्यक्षांनी मंजूरही केला; परंतु राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होईपर्यंत म्हणजेच 19 जूनपर्यंत तो अधिकृतपणे मंजूर होणार नाही. त्यामुळे त्यानंतर विखे यांचा भाजपात प्रवेश होईल असे बोलले जात आहे.