बाळ बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे. यावेळी पोलिसांकडून म्हणणे सादर केले जाणार असल्यामुळे आजच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रेखा जरे हत्याकांडमध्ये नगरच्या न्यायालयाने आरोपी बोठे याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी 31 डिसेंबर रोजी संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आज 28 जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार न्यायालयामध्ये म्हणणे सादर केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, रेखा जरे यांच्या हत्येला आता दोन महिने होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जरे यांचा मुलगा रुणाल व ऍड. सचिन पटेकर यांनी सोमवारी सायंकाळी पालकमंत्री मुश्रीफ यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी बोठे सापडत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. पण, पोलीस त्याला नक्कीच पकडतील, असा विश्वासही व्यक्त केला. सरकारने विशेष सरकारी वकील यादव पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी रुणाल जरे व ऍड. पटेकर यांनी केली. त्याला मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.