
लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांत झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून एकाचा खून करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे घडली आहे. या घटनेत दोनजण जखमी झाले असून, नगर तालुका पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतले आहे. तर, अन्य आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर वाळकी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
जावेद गनीभाई तांबोळी (वय 40, रा. वाळकी) असे मृताचे नाव आहे. तर, त्यांचे वडील गनीभाई तांबोळी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सलीम शेख (वय 40) व बाबा शेख (वय 40) यांना ताब्यात घेतले आहे.
तांबोळी व शेख हे वाळकी गावामध्ये एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी सकाळी लहान मुलांमध्ये भांडणे झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील मोठय़ा व्यक्तींमध्ये वाद झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन जावेद यांना पाईपने मारहाण करण्यात आली. त्यानंतर ते नगर येथे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेले होते.
उपचारानंतर जावेद हे फिर्याद देण्यासाठी नगर तालुका पोलीस ठाण्यात जात असताना गावातील काही लोकांनी जावेद यांना ‘तू गावामध्ये पुन्हा ये, आपण मिटवून घेऊ’, असे सांगितले. त्यामुळे तक्रार न देताच ते परत आले. दुपारी जावेद हे वाळकी येथे आले असताना शेख यांच्यासह अन्य काही लोकांनी जावेद व त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटांत झालेल्या मारहाणीत काहीजणांनी जावेद यांना अडवले. एकाने त्यांच्या डोक्यात व छातीवर दगड घातला. यात जावेद गंभीर जखमी झाले होते.
जखमी झालेल्या जावेद यांना तत्काळ नगर येथील आनंदऋषी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जावेद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे.
आनंदऋषी रुग्णालयात नातेवाईक व गावकऱयांनी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रुग्णालयात व घटनास्थळी दाखल झाले. वाळकी गावामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतले असून, जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली आहे.

























































