
अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचे दिसू येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून सराईत गुन्हेगारांना गजाआड केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 27 जुलै रोजी आंबिलवाडी शिवारात 500 रुपयांच्या बनावट नोटांसह फिरणाऱ्या निखिल गांगर्डे (वय – 27, रा. कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ शिंदे (वय – 25, रा. तपोवन रोड) यांना महिंद्रा ‘थार’ गाडीतून ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना दोन संशयित काळ्या महिंद्रा थारमधून बनावट नोटा घेऊन आंबिलवाडी शिवारात सिगारेट खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रदीप कापरे (वय – 28, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार), मंगेश शिरसाठ (वय – 40, रा. शिवाजीनगर), विनोद अरबट (वय – 53, रा. सातारा परिसर), आकाश बनसोडे (वय – 27, रा. निसर्ग कॉ लनी), अनिल पवार (वय – 34, रा. मुकुंदनगर) यांना अटक केली. अंबादास ससाणे (रा. टाकळी, ता. शेवगाव) हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी 59 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा, दोन लाख 16 हजार रुपयांचे कागद आणि शाई, 27 लाख 90 हजार 600 रुपयांचे मशीन, संगणक आदी साहित्य असा एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग, आदिनाथ शिरसाठ, अन्यार शेख, मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.
बँकांना पत्र पाठविण्यात येणार
राहुरी पोलिसांनी महिनाभरापूर्वी बनावट नोटांचे एक रॅकेट उघडकीस आणले होते. त्या नोटा लगेच लक्षात येण्यासारख्या होत्या. मात्र, या कारवाईतील नोटा अतिशय अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या हुबेहूब असून, सर्वसामान्यांच्या लवकर लक्षात येणार नाहीत अशा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांना पत्र पाठवून अशा बनावट नोटा बँकेत आल्या, तर पोलिसांना कळविण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
पानटपरीचालकाच्या सतर्कतेने गुन्हा उघड
नगर तालुक्यातील आंबिलवाडी परिसरातील एका पानटपरीवर संशयित दोन इसम वारंवार सिगरेट पाकीट घेण्यास येत होते. यावरून टपरीचालकाला या इसमांवर संशय आल्याने त्याने तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गीते यांना माहिती दिली. या माहितीवरून तालुका पोलिसांनी पाळत ठेवून आरोपीला गजाआड केले. पानटपरीचालकाची सजगता आणि सतर्कतेने बनावट नोटांचा कारखाना आणि रॅकेट उघडकीस आले असल्याने त्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.