खरेदी केंद्रापेक्षा बाजारात मिळतोय जास्त भाव, नगरमधील हरभरा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

जिह्यातील हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी 12 ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तुरीप्रमाणेच बाजारातही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 34 शेतकऱ्यांकडून 300 क्विंटलची खरेदी झाली आहे. आतापर्यंत केवळ 233 शेतकऱ्यांनी हरभराविक्रीसाठी नोंदणी केली आहे.

श्रीगोंदा, तीसगाव व पाथर्डी, खर्डा व जामखेड, कर्जत, नगर, पारनेर, राहुरी, नगर व साकत, शेवगाव, संगमनेर या 12 ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली. आतापर्यंत श्रीगोंदा केंद्रावर 7 शेतकऱ्यांकडून 25 क्विंटल, कर्जतला 2 शेतकऱ्यांकडून 15 क्विंटल, नगरला 28 शेतकऱ्यांकडून 52 क्विंटल, पाथर्डीला 11 शेतकऱ्यांकडून 154, राहुरीत 4 शेतकऱयांकडून 26 क्विंटल अशी अवघी 300 क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.

आतापर्यंत केवळ 233 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली असून, दोनशे शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणावा, यासाठी संदेश पाठवले असले, तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. संगमनेर, पारनेर येथे नोंदणीच झाली नाही.

तुरीची साडेसात हजार क्विंंटल खरेदी

नगर जिह्यात तुरीचे बंपर उत्पादन निघाले असल्याने 12 ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू केली. सुरुवातीच्या काळात थोडीफार खरेदी झाली. नंतर तुरीच्या दरात बाजारात वाढ झाली. सहा हजार रुपये हमीदर असताना बाजारात त्यापेक्षा अधिक दर मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्राकडेही पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. 3 हजार शेतकऱ्यांनी तूरविक्रीसाठी नोंदणी केलेली असताना केवळ 774 शेतकऱ्यांकडून साडेसात हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीचा आकडा एक लाख क्विंटलच्या पुढे गेला होता.