नगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक पदे रिक्तच

395

नगर जिल्ह्यातील 45 लाख लोकसंख्येचं आरोग्य सांभाळणार्‍या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार विस्कळीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 487 पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी 358 पदे भरली असून 130 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परिचारिका पदाच्या 100 जागा असून एक पद रिक्त आहे. मात्र, परिचारिका पदाच्या ज्या जागा भरल्या त्यातील 23 जागा अस्थायी स्वरूपाच्या आहेत. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पद भरतीची समस्या भेडसावत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे भरणे हे राज्य शासनाच्या आरोग्य विभागा समोरचे मोठे आव्हान आहे. सध्या हवामान बदलामुळे जिल्ह्यात अनेक आजार बळावत आहे. शिवाय डेंग्यूच्या रुग्णातही वाढ झाली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसते. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्तपदे भरली जावीत, शिवाय अस्थायी पदाबरोबरच स्थायी पदेही भरली जावीत, अशी मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवून आरोग्य सेवा सुरू केल्या. मात्र, आरोग्य सेवा देण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच नसल्याचे गंभीर चित्र सध्या सामान्य रुग्णालयात आहे. असेच चित्र अन्य तालूक्यांतही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या