तीन हजार क्विंटल चणाडाळीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा पुरवठा विभागाने नगर शहरासह सात तालुक्यांतील 3 लाख 9 हजार 303 रेशनकार्डधारकांना वाटप करण्यासाठी 3 हजार 131 क्विंटल चणाडाळीची मागणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस केली आहे. चणाडाळीची ही मागणी जून महिन्यातील असून डाळ प्राप्त होताच तिचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून केले जाणार आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकासाठी एक किंवा दोन किलो डाळ 45 रुपये प्रती किलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित दराने जून महिन्यासाठी चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक तालुक्यातील रेशनकार्डधारक व त्यांना वाटप करण्यासाठी आवश्यक असणार्‍या डाळीची माहिती तालुकानिहाय तहसीलदारांकडून मागवली होती. या वेळी राहाता, राहुरी, कर्जत, संगमनेर या तालुक्यांच्या गोदामात चणाडाळ शिल्लक असल्यामुळे या तालुक्यांतील रेशनकार्डधारकांसाठी नवीन डाळीची मागणी करण्यात आली नाही. तर, पाथर्डी तालुक्यात तुरीचे उत्पन्न जास्त झाले असल्याने व लाभार्थींकडूनदेखील चणाडाळीची मागणी केली जात नसल्याचे या तालुक्यासाठी चणाडाळ मागवण्यात आली नाही. कोपरगाव व अकोले या दोन्ही तालुक्यांमधूनदेखील चणाडाळीची मागणी झाली नाही. हे सर्व तालुके वगळता नगर शहरासह श्रीरामपूर, नेवासे, श्रीगोंदे, जामखेड, नगर, शेवगाव, पारनेर येथील रेशनकार्डधारकांसाठी चणाडाळीची मागणी करण्यात आली आहे. ही डाळ रेशनकार्डधारकांना 45 रुपये प्रती किलो दराने देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय चणाडाळीची मागणी

तालुका रेशनकार्डधारक चणाडाळीची मागणी (क्विंटल)
श्रीरामपूर    37 हजार 262 372
नेवासे        54 हजार 443 548
श्रीगोंदे       45 हजार 144 500
जामखेड     26 हजार 982 270
नगर तालुका 47 हजार 958 479
शेवगाव       40 हजार 800 408
पारनेर         53 हजार 79 529
नगर शहर      3 हजार 635 24