के के रेंज प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार – राज्यमंत्री तनपुरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-kk-range

नगरच्या के के रेंज या लष्कराच्या जागेचा विषय सध्या सुरू आहे. मात्र जागा आरक्षित करण्याबाबत कोणताही प्रस्ताव लष्कराकडून येथील प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. भविष्यामध्ये आरक्षणाचा विषय आल्यानंतर त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत एकत्रितपणे चर्चा करून विषय हाती घेतला जाईल. अद्याप पर्यंत आरक्षणाचा प्रस्ताव नसल्याचेही राज्याचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्‍यमंत्री तनपुरे म्हणाले की, ‘के के रेंज येथील लष्कराच्या जागेच्या आरक्षणाचा विषय सध्या पुढे आला आहे. तो जाणून घेण्यासाठी आज लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रशासनाची बैठक पार पडली. यावेळी लष्कराकडून रोहित शर्मा हे या बैठकीला उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये आम्ही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रकारचा प्रस्ताव येथील प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. मात्र सध्या के के रेंज संदर्भात जागा आरक्षित प्रकरणासंदर्भात अन्य काही गावांमध्ये जागा संरक्षित करण्याचा विषय लष्कराकडून हाती घेण्यात आलेला आहे. त्यामधील राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. प्रात्यक्षिके सराव करताना कुठलाही धोका होऊ नये, याकरता दर पाच वर्षांनी प्रशासनाकडून त्या हद्दीमध्ये कोणीही प्रवेश करू नये, यासाठी नोटिफिकेशन निघत असते. तसेच नोटिफिकेशन 2021 सालापर्यंत देण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र या तिन्ही तालुक्यातील कोणते गावे आरक्षित करायचे, याबद्दलचा कोणताही प्रस्ताव लष्कराकडून येथे प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. सध्या लष्कराकडे साधारणत: पंधरा ते वीस हजार हेक्‍टर जागा ही अगोदरच आरक्षित करण्यात आलेली आहे. नव्याने राहुरी तालुक्यातील बारा गावे, पारनेर पाच गावे, नगर तालुक्यातील सहा गावे, असे एकूण 25, 619 हेक्टर क्षेत्र असल्यामुळे त्या जागेचा आरक्षणाचा विषय सध्या सुरू होता.

आजच्या बैठकीमध्ये लष्कराकडून काही माहिती सुद्धा घेण्यात आलेली आहे. आगामी काळामध्ये पुन्हा एकत्र बैठक घेण्याचा निर्णयही झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जर लष्कराला जागा आरक्षित करायचे असेल व त्या संदर्भातला विषय असेल तर तो विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करूनच तो सोडवला जाईल, असेही मंत्री तनपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर येथे लष्करी अधिकारी व प्रशासनाची एकत्र बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.