
नगर ते कोपरगाव रस्त्याची दुर्दशा आता कुप्रसिद्ध रस्ता म्हणूनच होत आहे. मात्र, आता रस्त्याच्या चार पदरात एक बाजू किमान ठीक आहे, तर दुसऱया बाजूने वाहतूक बंदच आहे. त्यामुळे सध्या या रस्त्याचा एक पदर किमान जरतारीचा, तर दुसरा पदर पूर्ण फाटलेलाच आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा संपणार कधी? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
नगर कोपरगाव रस्त्यावर शिर्डी, शनिशिंगणापूर व साडेतीन शक्तिपीठे एकत्रित असलेल्या श्री क्षेत्र भगवती मातेची ठिकाणे येतात. पण या रस्त्याच्या दर्जामध्ये अद्यापि सुधारणा झालीच नाही. गत नऊ वर्षांत भाजप सरकार आल्यानंतर देशभर रस्ते बांधणी होत आहे. परंतु एकामागोमाग या रस्त्याचे कंत्राट घेतलेले ठेकेदार का काम करीत नाहीत, हासुद्धा संशोधनाचा विषय ठरतो. ज्यावेळी देशभर रस्तेबांधणी करून नवीन रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, त्याचवेळी या रस्त्याची केवळ डागडुजी करून जनतेचे कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. खड्डय़ातील या रस्त्यावर फक्त मलमपट्टी केली जात असल्याने हा रस्ता सलग राहिला नाही. एका बाजूने ठिकठाक झाला असून, दुसऱया बाजूला पूर्ण कच्चा रस्ता राहिला आहे. टक्केवारी व कमिशनचा मुद्दा जनतेसमोर ठेवला जातो. रस्त्याच्या कामास निधी नाही मिळत की ठेकेदार काम करत नाही, असे जनता विचारत आहे.
गडकरी साहेब जरा इकडेही लक्ष द्या ..!
रस्तेबांधणीत बांधकाममंत्री नितीन गडकरी आपण विक्रम केलात; मात्र नगर-कोपरगाव रस्त्याचं भिजत घोंगड कधी मार्गी लागणार? इथे अनेकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागतोय. वाहने रस्त्यामुळे खराब होत आहेत. मात्र, या महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रत्येकाला हाच प्रश्न आहे. सदर रस्त्याचं काम पूर्णत्वास केव्हा जाणार? तेव्हा साहेब थोडं लक्ष इकडेही द्या.
म्हणजे नगर-कोपरगाव रस्ता सुरू झाला…!
शिर्डी-शिंगणापूरला या रस्त्यावर वाहन आपटू लागले की समजावं नगर-कोपरगाव रस्ता सुरू झाला, अशी ख्याती या रस्त्याची झाली आहे. बसचालक आणि इतर अवजड वाहतूक करणारे या रस्त्यावरून जायचे म्हटले की कामास नकार देत नको रे बाबा असे म्हणताहेत. कारण वाहनांची आदळआपट होऊन वाहने आणि चालकांची हाडेही खिळखिळी होत आहेत.





























































