जुन्या वादातून तरुणाची हत्या

38

सामना प्रतिनिधी। नगर

जुन्या वादातून तलवार, कटावणी व लाकडी दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नगर तालुक्यातील वाकोडी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. विजय नारायण पवार ( 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या मारहाणीत जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव अविनाश नारायण पवार असून तो गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लखन सुंदर कांबळे, दिनेश नाथा सूर्यवंशी, कुंदन सुंदर कांबळे, जिगर सुंदर कांबळे (सर्व रा. वाकोडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील लखन कांबळे व दिनेश सूर्यवंशी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वाकोडी शिवारात जुन्या वादातून हाणामारी झाली होती. या हाणामारीत विजय पवार व अविनाश पवार या दोघांना गंभीर दुखापत झाली होती. डोक्यास इजा झाल्याने उपचार सुरू असताना विजय पवार यांचा मृत्यू झाला. अविनाश पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सोनू नारायण पवार यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या