
नगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला जोरदार दणका बसला. भाजपने एकाही पदासाठी अर्ज दाखल केला नाही. महापौर-उपमहापौर पदांसाठी विरोधकांचा अर्ज दाखल न होण्याची महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
नगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपमहापौरपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँगेसचे चार नगरसेवक उपस्थित होते. महापौर-उपमहापौर पदांसाठी एक-एकच अर्ज आल्यामुळे दोघांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. या पदांसाठी उद्या (दि. 30) निवडणूक होणार असून, बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.





























































