
सामना प्रतिनिधी। नगर
सत्तेवर आल्यावर मोदींमध्ये इच्छाशक्ती दिसली नाही. ते मुख्यमंत्री असताना गुजरातचे लोक देखील लोकायुक्त नेमण्याची मागणी करत होते. मात्र मोदींनी नाही तर राज्यपालांनी लोकायुक्त नेमला आणि मोदींनी त्याला हायकोर्टात आव्हान दिले. मात्र हायकोर्टाने मोदीं विरोधात निकाल दिला. तरी मोदी सुप्रीम कोर्टात गेले यावरून त्यांची इच्छाशक्ती दिसते अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
तसेच जोपर्यंत केंद्र सरकार लोकपाल नेमणूकीवर यावर ठाम निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
सर्वांना या कायद्याची भीती आहे म्हणून आज पर्यँत याची नेमणूक करण्यात आलेली नाही, मागच्या सरकारला घरी जावं लागलं मात्र सर्वांना वाटलं होतं मोदी सरकार आल्यावर कायदा आणतील, मात्र त्यांनी कायदा कमजोर केला. असा आरोपही अण्णांनी केला.
तसेच मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देखील मानले नाही, मात्र न्यायालय आणि जनशक्तीचा दट्या म्हणून सरकारला कायदा करावा लागला. सत्तेवर आल्यावर जर निर्णय घेतला असता तर भ्रष्टाचाराला आळा बसला असता असं मतही अण्णांनी यावेळी व्यक्त केलं.
जर तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही प्रश्न का सोडवत नाहीत. अण्णा एक फकीर आहेत. माझ्याकडे काही बँक बॅलन्स नाही, पोर बाळं नाही मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत असतो, आंदोलन करत असतो असे सांगून त्यांनी लोकपालचा प्रश्न सोडवावा अशी मागणीसुध्दा पुन्हा केली.

























































