
राज्यातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरताना दिसत आहेत. विशेषत: तरुण शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे शेतीप्रयोग करताना दिसतात. नगर जिह्यातील दैठणे-गुंजाळ गावचे शेतकरी बाळासाहेब गुंजाळ आपल्या 10 एकर शेतीत तैवान पिंक पेरूची लागवड करून वर्षावाठी दर एकरी सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पुरेपूर नियोजन केले तर दुष्काळी भागातही कमी पाण्यात शेती करून चांगला नफा कमकता येतो, हे गुंजाळ यांनी दाखवून दिले आहे.
आठ महिन्यांत घ्या उत्पन्न
तैवान जातीच्या पेरूची खासियत म्हणजे लागवड केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. गुंजाळ यांनी 12 महिन्यांत 10 ते 12 टन पेरूचे उत्पन्न घेतले आहे. पेरू 35 ते 40 रुपये किलो दराने बाजारात विकले जातात. वर्षभरात त्यांनी एक एकर शेतीतून तीन ते चार लाख रुपये कमावले आहेत. या लागवडीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे बाळासाहेब गुंजाळ यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
बाळासाहेब गुंजाळ गेल्या 20 वर्षांपासून शेतीत प्रयोग करत आहेत. त्यांनी एमए., डीएड, बीएड शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करण्यापेक्षा त्यांनी पूर्ण वेळ शेती करणे पसंत केले. पारनेर तालुका तसा कमी पावसाचा आणि डोंगराळ भाग असलेला तालुका. या भागात वेगवेगळी पिके घेतली जातात. मात्र त्यातून चांगले उत्पन्न मिळेलच याची खात्री नाही. गुंजाळ यांच्याकडे 35 एकर जमीन असून ते 10 एकरात पेरूची शेती करतात. 10 एकरमध्ये संत्री, 5 एकरात मोसंबी आणि 3 एकरमध्ये पपई शेती करतात. यात तैवान जातीच्या पेरूची चर्चा जास्त आहे. त्यांची लागकड 8 बाय 5 फूट अंतरावर सघन पद्धतीने केली जाते. कोणत्याही रसायनांचा वापर न करता फक्त शेणखत वापरून वर्षभर हे पीक घेता येते.
आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून सघन पद्धतीने लागवड करतो. दुष्काळी भाग असूनही कमी पाण्यात अधिक उत्पन्न वाढण्यावर भर असतो. नवीन तंत्रज्ञान वापरून निर्यातपूरक माल वाढतो. मी वाॅटरबँक तयार केली आहे. 5 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे, असे गुंजाळ यांनी सांगितले.
- तैवान पिंक पेरूला चांगली मागणी आहे. हे फळ 400 ते 900 ग्रॅम इतके वजनाला भरते. अतिशय मऊ आणि गोडीला कमी आहे. शहरांमध्ये त्याला जास्त पसंती आहे. पेरूची टिकण्याची क्षमताही जास्त आहे. मुंबईसह आसाम, गुजरात, केरळ या राज्यांत गुंजाळ यांच्या शेतातील पेरू जातो.
- ज्या शेतकऱयांना आपल्या तैवान पेरूचा प्रयोग करायचा आहे, ते त्यांना गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरीमधून रोपे मिळू शकतात. नुसती रोपंच नव्हे तर लागवडीचे पूर्ण मार्गदर्शनही केले जाते.
































































