
सामना प्रतिनिधी । मुंबई
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या मुलांना आता राजकारणातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय यांच्यासाठी काँग्रेसने नगरच्या जागेवर दावा केल्याचे पुढे आले आहे.
आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपासाठी सध्या जोरदार बैठका सुरू आहेत. शनिवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजयसाठी नगरमधील लोकसभेची जागा मागण्यात आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीव राजळे यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या रिंगणात चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यदही पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दावा करीत सुजय विखे -पाटील यांचे नाव पुढे केले. जागावाटपाच्या या बैठकीत काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला होता असे सांगण्यात येते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर-मध्य मुंबईतील जागा मागितली असल्याचे समजते. या भागातील काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त सध्या राजकारणात सक्रिय नाहीत काँग्रेसने त्यांच्याकडील संघटनात्म जबाबदारीही काढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ सहभागी झाले होते.
घराणेशाहीला फाटा
सुजय विखे-पाटील यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेससचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा मागितली होती, पण शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या नावावर काट मारल्याचे सांगण्यात येते. कुटुंबातील लोकांनी निवडणुका लढवल्या तर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असे सांगत शरद पवार यांनी पार्थंच्या नावावर फुली मारली.

































































