
रंगपंचमीच्या निमित्ताने तसेच विविध सण उत्सवाच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांसह नगर शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांवर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
भाजपाचे नगरसेवक स्वप्नील शिंदे व मनोज दुल्लम तसेच अभिमन्यू जाधव, महेश सुरेश धनगर, अनिल ढवन, सनी ताठे, रोहित साठे, सार्थक गंधे, जीवन शेळके, सुरज शिंदे, निखिल येमुल, दिनेश फिरके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदे, महेश धनगर, अनिल ढवन, सनी ताठे, रोहित साठे, सार्थक गंधे, जीवन शेळके यांनी वैदुवाडी येथील वृंदावन लॉनच्या पार्किंगमध्ये रंगपंचमी उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तर आरोपी असलेल्या नगरसेवक मनोज दुल्लम आणि सुरज शिंदे यांनी नगर-मनमाड रस्त्यावरील मेघनंद लॉन येथे रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पोलीस गेले असता परवानगी संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आम्ही कार्यक्रम घेणारच, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. अशा पद्धतीने उद्धटपणे बोलून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिमन्यु जाधव आणि दिनेश फिरके यांनी शहरातील बंधन लॉन येथे रंगपंचमी निमित्त रंग बरसे या कार्यक्रमाचे विनापरवाना आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर वाहनांची पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या सुचनांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरामध्ये कोरोना रुग्णसंख्या जरी कमी झालेले असले तरी दुसरीकडे राज्य सरकारने सर्व उत्सवासंदर्भामध्ये एक नियमावली नव्याने तयार केलेली आहे. या नियमावली मध्ये नियमांचे कशा पद्धतीने पालन करायचे या संदर्भातला आदेश दिला होता. नगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये असणारे भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे व दुसरे नगरसेवक मनोज दुल्लम यांच्यासह आरोपींनी काल रंगपंचमीच्या निमित्ताने त्यांच्या त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना बोलून त्या ठिकाणी रंगपंचमीचा उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच जे काही नियम होते त्याची पायमल्ली केली असल्याने तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.























































