केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मिळणार

965

नगर जिल्ह्यातील एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मे व जून, 2020 या 2 महिन्याच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण 14 लाख 90 हजार 17 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे वितरण मे आणि जून या महिन्यांसाठी असल्याने लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकानांमोर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

31 डिसेंबर 2019 ला मिळालेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना देय धान्याचा कोठा मे महिन्यासाठी असल्याने अशा पात्र लाभ्यार्थ्यांनी एप्रिल 2020 मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे गर्दी करु नये अथवा याबाबतच्या चौकशीसाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडे संपर्क साधू नये. देय धान्याचा कोठा 1 मे 2020 पासून वितरीत करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिव्यक्ती महिन्याला 5 किलो तांदुळ मोफत वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 30 लाख 19 हजार 277 एवढ्या सदस्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या एपीएल (केशरी) मधील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिड़ींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात येत आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी अन्नधान्य वाटप करीत असताना त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपुर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या