नगरमध्ये भरदिवसा घरफोडी; रोख रक्कमेसह सोन्याचे दागिन्यांची चोरी

23

सामना प्रतिनिधी । नगर

शहरासह उपनगरात चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत चोरट्यांनी मजल गाठली आहे. भिस्तबाग चौकात गजबजलेल्या भागात भरदिवसा बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील सुमारे एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख पस्तीस हजार रुपये चोरले. ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकातील गणेश विहार अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रिंटींग प्रेसचालक अविनाश बापुराव आठरे (रा. गणेश विहार, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अ.नगर) यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते लग्नाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी पत्नीसह बाहेर गेले होते. त्यांची मुलगी चैताली खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरांनी तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील कपाटातील एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपयाची रोकड चोरून नेली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अविनाश आठरे यांच्या तक्रारीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या