
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळांकडून तयारीला वेग आला असून, मंडप उभारणीची कामे सुरू झाली आहेत. महापालिकेकडे 78 गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले असून, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर जिह्यामध्ये 1200 सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
गणेश उत्सवासाठी सर्वत्र मंडप उभारण्याची लगबग सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ अशी संकल्पना राबवली जाते. नगर शहरासह जिह्यात आतापर्यंत सुमारे 1200हून अधिक मंडळांनी परिसर परवानगीसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. गेल्या आठवडेभरापासून परवानगीसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.
न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी दिली जाते. त्यासाठी महापालिकेत एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अग्निशमन विभाग नगर रचना विभाग एकाच ठिकाणी परवानगी देत आहेत. परवानगीसाठी शहरातील मंडळांकडून 78 अर्ज महापालिकेकडे दाखल करण्यात आले होते. या सर्वांची छाननी होऊन त्यांना परवानगी मंजूर करण्यात आली आहे.
मंडप तपासणीसाठीची समिती कागदावरच
शासनाच्या निर्देशानुसार तहसीलदारांच्या नियंत्रणाखालील प्रशासकीय समितीमार्फत शहरातील गणेश मंडळांनी उभारलेल्या मंडपांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही समितीच स्थापन झाली नसल्याचे समोर येत आहे. महापालिका प्रशासनाकडेही समिती स्थापन झाल्यासंदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे सांगण्यात आले.



























































