एमआयडीसी पाणी योजनेचा स्लॅब कोसळला, आठ कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

तालुक्यातील देहरे येथील एमआयडीसी पाणी योजनेच्या संपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळून आठ कामगार जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सय्यद अन्सारी अरबास (वय 37, राहणार बिहार), जावेद अन्सारी (वय 26, राहणार बिहार), गण्णुरसिंह सुमिंदरसिंह (वय 24, राहणार बिहार), पवन मोरे (राहणार मध्यप्रदेश), दयाराम मोरे (वय 24), निलेश ब्राम्हणे (वय 18, जिल्हा बिडवाणी), अशोक कुमार जलेशायराय (रा.बिहार ) अशी जखमींची नावे आहेत.

देहरे येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. आज सकाळी नेहमीप्रमाण कामगार आले होते. त्यांनी काम सुरू केले. मात्र, वेळेतच स्लॅब कोसळला. 8 हजार स्क्वेअर फुटावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे मजुरांची संख्याही मोठी होती. भल्या सकाळीच स्लॅब टाकण्याची टोळी आली होती. स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा स्लॅब कोसळला. त्यामध्ये 8 कामगार जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या कर्मचारी दाखल होत त्यांना अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. काही कामगार गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने या घटनेचा तपास सुरु केला असून सायंकाळी रुग्णालयात संबंधीत जखमीचें जबाब घेण्याचे काम सुरु असून रात्री उशिराने या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी स्पष्ट केले.