भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर-दौंड महामार्गावरील हिवरे झरे ते चिखली शिवारात घडली आहे. सागर बाळू काळे (वय 25, रा. काळेवाडी, हिवरे झरे, ता. नगर) असे मृताचे नाव आहे.

सागर हा ट्रक्टरचालक होता. सोमवारी (दि.4) दिवसभर काम केल्यानंतर तो चिखली येथे ट्रक्टर मालकाच्या घरी ट्रक्टर लावायला गेला होता. तेथून रात्री दुचाकीवरून हिवरे झरे गावाकडे येत असताना म्हसोबाचा ओढा परिसरात भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेने तो दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला.

रात्रभर ही बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही. मंगळवारी (दि.5) सकाळी एका पाव विक्रेत्याने त्याला पाहिले. त्यानंतर गावकऱयांना फोन करून माहिती दिली असता, मृत तरुण हा सागर काळे असल्याचे उघडकीस आले. मंगळवारी (दि.5) दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मृताचा भाऊ माधव बाळू काळे (रा.हिवरे झरे ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.