‘नगर अर्बन’साठी पहिल्या दिवशी सहा उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सत्ताधारी स्व. दिलीप गांधीप्रणीत सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेत अर्ज दाखल केले आहेत.

सर्वसाधारण गटातून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल यांच्यासह ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपत बोरा; तसेच माजी संचालक दीपक गांधी यांच्या पत्नी संगीता गांधी यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे दाखल केले आहेत.

नगर अर्बन बँकेची मागील निवडणूक 2014 मध्ये झाली होती. यावेळी सत्तेत आलेल्यांची मुदत 2019 मध्ये संपण्याआधीच हे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. या नियुक्तीला आता सव्वादोन वर्षे झाली आहेत. बँकेचा एनपीए वाढलेला असल्याने व प्रशासकाकडूनही थकबाकी वसूल होऊन हा एनपीए कमी होण्याची चिन्हे नसल्याने चक्क रिझर्व्ह बँकेनेही नगर अर्बन बँकेच्या मागील कारभाराबद्दल हात टेकल्याची स्थिती आहे.

अशा वेळी शेवटची संधी म्हणून लोकनियुक्त संचालक मंडळाच्या ताब्यात बँकेचा कारभार देण्यासाठी केंद्रीय सहकार निबंधकांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना अर्बन बँकेची निवडणूक घेण्याचे सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या 18 जागा असून, 56 हजार मतदार आहेत. त्यांच्याद्वारे मतदानातून आता बँकेवर नवे संचालक मंडळ येणार आहे.

बिनविरोध चर्चा निष्फळ

नगर अर्बन बँक आर्थिक अडचणीत असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची गरज नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने मांडली होती. सुरुवातीला मागील 2014 ते 2019 या दरम्यान बँकेत सत्तेवर असलेल्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यांचे काहीजण पॅनलमध्ये घेतल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची त्यांची तयारी होती.

पण, मागील 2014 ते 2019 या काळात सत्तेत असलेल्या कोणत्याही उमेदवाराला यात घेतले जाणार नाही, अशी भूमिका बँक बचाव कृती समितीने घेतल्याने मागील सत्ताधाऱयांनी बिनविरोधच्या चर्चेतून माघार घेतली व स्वतंत्र पॅनल करण्याची तयारी सुरू केली. बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी या पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. आज त्यांच्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.