स्मृतिगंध – कर्तव्यतत्पर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नागेश शेवाळकर

गुरुवर्य राम शेवाळकर यांनी वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारले. एखादी कामगिरी अंगावर घेतली की, ती अंग झोकून देऊन पार पाडणे यात शेवाळकरांचा हातखंडा होता. प्राचार्यपद स्वीकारल्यानंतर त्यांनी मनातल्या मनात एक अलिखित नियम केला, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करीन. ही प्रतिज्ञा करताना काही वाटले नाही; परंतु प्रशासकीय कामात कसे अडथळे येतात, या गोष्टीचा प्रत्यय त्यांना येऊ लागला. अनेक वेळा शासकीय अनुदान वेळेवर न आल्यामुळे एक तारखेला पगार होणे अशक्य! अशी परिस्थिती निर्माण झाली; परंतु शेवाळकर हातपाय गाळून बसणाऱ्यांपैकी नव्हते.  त्या महिन्याच्या एक तारखेस त्यांनी भैयाजी ढुमे यांच्याकडून उसने पैसे घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार वाटप केले.

याच संदर्भातील एक आठवण अशी. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्यासाठी अनेकदा भैयाजींकडे न जाता  सकाळीच सारी कामे आटोपून शेवाळकर विजयाताईंसमोर नि:शब्द उभे राहत. ते पाहून विजयाताई विचारत, ”दागिने हवेत ना?” शेवाळकरांच्या उत्तराची वाट न पाहता पुढे होत दागिने त्यांच्या हवाली करीत आणि म्हणत, ”घ्या. मला कालपासूनच तुमची तळमळ जाणवत होती. म्हणून सकाळीच काढून ठेवलेत. जा सर्वांच्या पगारी करा.” तो ऐवज हातात घेताना शेवाळकरांना होणारा अवर्णनीय आनंद केवळ विजयाताईंनीच अनुभवला असेल.

प्राचार्य शेवाळकर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किती विचार करीत याचे एक उदाहरण पुरेसे आहे. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्पामाला त्यांनी मारोती कुळमेथे या निवृत्त कर्मचाऱ्यास पाचारण करून प्रमुख पाहुण्याचे स्थान दिले. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाच्या फाटकाजवळ जाऊन स्वत: प्राचार्यांनी कुळमेथे यांचे स्वागत केले आणि सन्मानाने त्यांना प्राचार्यांच्या दालनात घेऊन आले. शेवाळकर यांची ती आदराची भावना पाहून कुळमेथे यांचे डोळे पाझरू लागताच खुद्द शेवाळकर यांचेही नयन पाणावले.

एकदा प्रा. शेवाळकर यांच्या महाविद्यालयातील एका गरीब विद्यार्थ्याने चाळीस रुपये फीस भरू शकत नाही म्हणून सरळ महामहीम राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याचे शेवाळकरांना समजले. त्यांनी त्या शंकर नावाच्या विद्यार्थ्याचे शुल्क भरले. त्याला समजावून सांगितले, ”तू बी.ए. झालास की भेट, तुझ्या नोकरीची मी व्यवस्था करतो.” बीएचा निकाल लागला. शंकर चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला, परंतु दोनच दिवसांनी शंकरने आत्महत्या केल्याची बातमी समजताच प्रा. शेवाळकर भरलेल्या गळ्याने म्हणाले, ”शंकर, हा निर्णय घेण्यापूर्वी एक वेळ तू माझ्याशी चर्चा केली असतीस तर? या जगात ज्या व्यक्तींवर विश्वास टाकावा अशा लोकांच्या तुझ्या यादीत माझेही नाव नसावे? हा माझ्या अध्यापकीय आयुष्यातील सर्वात मोठा आणि अक्षम्य पराभव आहे.”