
>>नागोराव सा. येवतीकर<<
मी एकटाच चुकीचे वागलो तर काय फरक पडणार आहे, असा विचार केल्याने ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण सार्थ होऊ शकत नाही. तेव्हा आधी आपली नकारात्मक विचारशैली बदलणे गरजेचे आहे. अशा अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्याच्याकडे जागरूकपणे लक्ष दिल्यास आपल्या हातून फार महान काम होऊ शकते. जाग माणसा जाग असे म्हणण्याची वेळ आली आहे. आपण स्वतःही जागे व्हा आणि सर्वांना जागे करा. जगप्रसिद्ध ग्वेन डायर वर्ल्ड ह्यू स्तंभाखालील ‘त्या’ बेडकासारखी आपली अवस्था होऊ नये याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
जगप्रसिद्ध ग्वेन डायर वर्ल्ड व्हय़ू स्तंभाखालील ‘वुई आर फ्रॉग इन दी पॉट’ या लेखातून त्यांच्या शिर्षकाचा अर्थ सांगतो की, बेडूक उचलून जर उष्ण पाण्यात टाकले, तर ते चटकन उडी मारून बाहेर पडते. मात्र तेच जर थंड पाण्याने भरलेल्या भांडय़ात ठेवले आणि मंद आचेवर ठेवून पाणी हळूहळू तापविले तर बेडूक छानपैकी शिजते. भांडय़ातून उडी मारून बाहेर येत नाही. आज आपलीसुद्धा अवस्था त्या बेडकासारखीच झाली आहे.
पुढे लेखक म्हणतो की, जागतिक बँकेच्या अप्रकाशित अहवालानुसार तापमान जर दोन डिग्री सेल्सिअसने वाढले, तर हिंदुस्थानचे अन्नधान्य उत्पादन २५ टक्क्यांनी आणि चीनचे उत्पादन ३८ टक्क्यांनी घटेल. तसेच भूजल साठेही संपलेले असतील. यावरूनच लेखकाने वरील प्रयोगाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. देशाच्या राजधानीपासून ते गल्ली बोळातल्या सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनावर चालणाऱ्या गाडय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या घरात जेवढे सदस्य तेवढय़ा गाडय़ा आहेत. गेल्या दहा वर्षांत इंधनाचे दर तब्बल अडीच पट वाढले आहेत. पुढील पाच वर्षांत किती जातील याचा नेम नाही. आपली अवस्था त्या बेडकासारखी झालेली आहे. जेव्हा टंचाई वा उणीव वाटते त्याच वेळी माणूस जागा होतो. इतर वेळी मात्र त्याचा अपव्यय करतो. हळूहळू या संकटात एवढे गुरफटून जातो की, आपल्याला त्यातून बाहेर पडताच येत नाही.
पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची निर्मिती करणे निश्चितच आपल्या हातात नाही; मात्र त्या इंधनाची आपण नक्कीच बचत करू शकतो. शहरात किंवा एक-दोन किलोमीटरच्या आत फिरत असताना शक्यतो गाडीचा वापर टाळणे योग्य राहील. त्यासाठी पर्याय म्हणून पायी जाणे किंवा सायकलचा वापर केल्यास आपला शारीरिक व्यायाम तर होईलच. शिवाय वाटीभर इंधनाची बचतही होईल. आपली बचत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची बचत आहे. ही जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. गाडीचा वापर शक्यतो, अशा ठिकाणी केला जावा. ज्या ठिकाणी गाडीशिवाय पर्यायच नसतो. मात्र आजकाल आपण स्वतःची इमेज, स्टेटस व इगो यामुळे या समस्यांकडे संपूर्णपणे कानाडोळा करून वागत आहोत. सध्या आपल्याला इंधनटंचाईचा फारसा चटका जाणवत नसल्यामुळे त्याचे काहीच वाटत नाही. मात्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा हा साठा संपून गेल्यानंतर काय? त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने इंधनाची बचत करावी. इंधनाच्या बचतीतून जो पैसा वाचेल ती एकप्रकारे देशाचीच संपत्ती वाचली, असे म्हणावे लागेल.
विजेची बाबसुद्धा इंधनासारखीच आहे. विजेची निर्मिती करणे हे सामान्य माणसाच्या हातात नाही. मात्र पावलोपावली त्याची बचत करता येते. बचत म्हणजे एकप्रकारे वीज निर्मितीच होय. त्यास्तव अत्यंत जागरूकपणे विजेचा वापर करणे आवश्यक आहे. दिवसा घराची दारे व खिडक्या खुल्या ठेवून सूर्यप्रकाशाचा वापर करण्याऐवजी दारे-खिडक्या बंद करून आपण विजेच्या दिव्याचा वापर करतो. गरज नसताना पंखे व दिवे बंद करणे आवश्यक आहे. मनोरंजनाचा विचार केल्यास पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेथे रेडिओ होता त्याची जागा आता टीव्ही आणि संगणकाने घेतली आहे. रोजच्या टीव्ही पाहण्यामुळे आपल्या पुटुंबाची किमान एक युनिट वीज खर्ची पडते. त्यात थोडीफार बचत कशी करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे.
टीव्ही बंद केला तर आपल्या पुटुंबात खूप काही बदल बघायला मिळेल. लहान मुले व मोठी माणसे यांच्यात संवाद वाढेल. त्यांच्यात आत्मीयता निर्माण होईल. टीव्हीमुळे पुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली राहून विभक्त असल्यासारखे वाटतात. लहान मुले अजिबात ऐकेनाशी झाली. पुटुंबप्रमुखाचेही कामात लक्ष नाही, गृहिणीचे स्वयंपाकात लक्ष नाही, कारण त्या सर्वांचे लक्ष टीव्हीवरील कार्यक्रमाने वेधून घेतलेले असते.
जुन्या बल्ब किंवा यंत्राचा वापर शक्यतो टाळावा. कारण जुनी यंत्रे नवीन यंत्रापेक्षा जास्त वीज खर्च करतात आणि त्याचा लाभसुद्धा आपणाला कमीच मिळतो. त्यास्तव विजेची बचत करण्यासाठी जे काही आपल्याला शक्य होते ते सर्व करावे. कारण पुढे हीच बचत आपल्या कामाला येऊ शकते.
स्वयंपाकघरातील गॅसचा वापर सजगपणे करणे आवश्यक आहे. स्वयंपाक संपल्यानंतर गॅसचा मेन स्वीच बंद करण्यास कधीही विसरू नये ही छोटीशी सवय आपणाला अनेक धोक्यापासून वाचविते आणि नकळत गॅसबचतही होते. हिवाळ्याच्या मोसमात पाणी गरम करण्यासाठी गॅसचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यास्तव त्याकाळात गॅसची टाकी लवकर संपते. तेव्हा सौरबंब बसवणे कधीही चांगलेच. सौर ऊर्जा हे एक असे इंधन आहे की, जे कधीच संपणार नाही. त्याचा वापर करण्यावर महिलांनी पुढाकार घेतल्यास भविष्यात सौर ऊर्जेचा वापर वाढत जाऊन इतर अनेक समस्या आपोआप कमी होतील.
जी वस्तू मुबलक प्रमाणात मिळते तिचा वापर आपण मातीमोल पद्धतीने करतो. जसे की पाणी, देशात जवळपास सर्वच भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळते म्हणून पाण्याची कोणीही बचत करीत नाहीत. पण ज्यावेळी कडक उन्हाळा पडतो तेव्हा हीच माणसे घोटभर पाण्यासाठी त्रासून जातात. पाण्याची निर्मितीदेखील आपण करू शकत नाही. ती नैसर्गिक देणगी आहे. शेती करताना कमी पाण्याचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे. मात्र फार कमी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. साधी नळाला तोटी बसवून घेण्याचीही आपली तयारी नसते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाहून जाते. पण त्याची पुणालाही चिंता नाही. त्यामुळे नळाला मीटर बसवून नळपट्टी वसूल केल्याशिवाय पाण्याच्या अपव्ययास आळा बसणार नाही. काही मंडळी पाण्याचा पैसा करीत आहेत. याकडे शासनाने लक्ष द्यावे, नैसर्गिक देणगी असलेल्या पाण्याच्या साठय़ाचे व्यवहार बंद करावेत. अन्यथा आजच आपण पाणी विकत घेतो. आगामी काळात पेट्रोलपंपासारखे पाणी पंप उघडल्यास नवल वाटू नये.
मी एकटाच चुकीचे वागलो तर काय फरक पडणार आहे, असा विचार केल्याने ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण सार्थ होऊ शकत नाही. तेव्हा आधी आपली नकारात्मक विचारशैली बदलणे गरजेचे आहे. अशा अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्याच्याकडे जागरूकपणे लक्ष दिल्यास आपल्या हातून फार महान काम होऊ शकते. जाग माणसा जाग असे म्हणण्याची वेळ आली आहे. आपण स्वतःही जागे व्हा आणि सर्वांना जागे करा. त्या बेडकासारखी आपली अवस्था होऊ नये याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.























































