
क्रिकेट सामना जिंकून परत जाणाऱया दोन क्रिकेटपटूंवर काळाने यवतमाळजवळ झडप घातली. रस्ते अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. चापडोह पुनर्वसनजवळ नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शनिवारी हा अपघात झाला. जयेश प्रवीण लोहिया (10), अक्षद अभिषेक वैद (11) अशी मृतांची नावे आहेत. ब्रदरहूड क्रिकेट क्लब, वर्धाचे हे क्रिकेटपटू होते. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.
पद्मविलास क्रिकेट क्लबने यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर टी-20 सामन्याचे आयोजन केले होते. शनिवारचा सामना झाल्यानंतर वर्धा येथील क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू कारने (एमएच-32 एएच 3777) पालकांसोबत वर्ध्याकडे निघाले होते. दरम्यान, नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागेवरच मृत्यू झाला. इतर क्रिकेटपटूंसह त्यांचे पालक गंभीर जखमी झाले आहेत.
मृत जयेश ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याने 6 बळी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.


























































