शेतकऱ्यांना मदत न केल्याने जनतेने तुम्हाला विरोधकांमध्ये बसवले

1189

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्दय़ावरून राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज भाजपच्या सदस्यांना चांगलेच चिमटे काढले. तुम्हाला शेतकऱ्यांचा आलेला पुळका किती नाटकी आहे हे महाराष्ट्र जाणतो, सत्तेत असताना शेतकऱ्यांना तुम्ही मदत केली नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला विरोधकांमध्ये बसवण्याचे काम केले आहे. केंद्राकडून 14 हजार 600 कोटी रुपये आलेले नसतानादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी विरोधकांना सुनावले.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्दय़ावरून विधानसभेत भाजपचे सदस्य गोंधळ घालत असताना सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास उभे राहिले. त्यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हरकतीची मुद्दा उपस्थित केला. भाजपच्या सदस्यांना बाकावर बसायला सांगा मगच बोलण्यास सुरुवात करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. पण तरीही भाजपच्या सदस्यांनी गोंधळ सुरू होता तेव्हा जयंत पाटील यांनी भाजपच्या सदस्यांना सुनावण्यास सुरुवात केली.

सत्तेत असताना मदत केली नाही
विरोधी पक्षाच्या सदस्यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले की, सत्ता असताना तुम्ही काही केले नाही, पण आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करीत आहेत ती हास्यास्पद आहे. सत्तेत असताना तुमचे हात कोणी धरले होते, तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करता आली असती, पण तुम्ही ती केली नाही आणि आजचा हा कांगावा तुम्हाला शोभत नाही. महाराष्ट्र सरकारने आजच्या काळात जे काम सुरू केले आहे ते सांगण्याची संधीदेखील तुम्ही सत्तारूढ पक्षाला देत नाहीत. अशा घोषणा देणे आणि बॅनर फडकवणे अतिशय दुर्दैवी आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची चिंता तुम्ही करू नका. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून मदत
राज्य सरकारने आतापर्यंत 6 हजार 600 कोटी रुपयांचे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केलेले आहे. त्यातील 2100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वितरित झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप चालू आहे याकडे जयंत पाटील यांनी विरोधकांचे लक्ष वेधले.

आमच्यासोबत पंतप्रधानांकडे चला
राज्य सरकाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 7 हजार 400 कोटी रुपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7 हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केलेली आहे. सभागृहात घोषणा देण्यापेक्षा आणि बॅनर फडकवत बसण्यापेक्षा आमच्यासोबत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चला आणि केंद्र सरकारला सांगा की, दुष्काळग्रस्तांचे पैसे तत्काळ द्या, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मारला. केंद्राचे 14 हजार 600 कोटी रुपये केंद्राकडून आलेले नसतानादेखील मदतीचे वाटप सुरू आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

पाच वर्षे तुम्ही विरोधी बाकावर
सभागृहातील गोंधळावरून विरोधकांना चिमटा काढताना जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांनी संयम ठेवायला शिकावे. पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्ही विरोधी पक्षात आहात. घोषणा करण्यासाठी बरीच सवय लागते. त्याची तुम्हाला अजून सवय नाही. या आठवडय़ात तुम्हाला घोषणा करण्याची सवय करून देतो. पुढची पाच वर्षे तुम्हाला घोषणा देण्याचा चांगला अनुभव मिळेल. तो अनुभव देण्याचे काम हे आम्ही निश्चितपणे करू.

श्रेयासाठीच भाजपचा आटापिटा
राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांप्रती फार कळवळा असल्याचे भाजप भासवत असला तरी तो साफ खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी शेतकऱ्यांबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. भाजपने शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या. त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. अजूनही राज्यातील लाखो शेतकरी बोंडअळीची मदत, पीक विम्याची भरपाई आणि कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे. आज ते शेतकयांचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांच्या सरकारच्या काळात झालेली फसवणूक पाहता त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची त्यांनी पाहणीही केली आहे. शेतकयांना मदत करण्यासंदर्भात कामाला सुरूवात झालेली आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यात लक्ष घातले आहे. शेतकयांना मदत देण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू असल्याने हे आमच्याच प्रयत्नांमुळे घडत असल्याचे चित्र रंगवण्यासाठी आणि पुढील काळात त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपने आटापिटा सुरू केल्याचे आ. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

पाण्याबाहेरील माशासारखी भाजपची अवस्था
पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर ज्याप्रमाणे तफडफतो, त्याप्रमाणे हातातून सत्ता गेल्यामुळे भाजपा नेत्यांची अवस्था झाली आहे. भाजपा सत्तेशिवाय जगूच शकत नाही. हातातून सत्ता गेल्यामुळे त्यांची अवस्था बिथरल्यासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केली. भाजपने राज्यावर पाच वर्षे राज्य केले. या पाच वर्षांचा कचरा दोन दिवसांत तर साफ होणार नाही ना, असा सवाल करून आव्हाड यांनी महाराष्ट्रातील विस्कटलेली घडी बसविण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षे लागतील असे स्पष्ट केले. कोणतेही नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याला परिस्थिती समजून घेण्यासाठी 6 ते 8 महिने लागतात; पण उद्याच युद्ध संपवायचे आहे अशा आवेशात भाजपा सरकार वागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

फडणवीसांना पराभव पचला नाही
राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळाचे पहिले अधिवेशन असताना सभागृहात गोंधळ निर्माण केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पराभव झाला आहे हे मान्य नाही, फडणवीस पराभव पचवू शकत नाहीत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

विरोधकांना गोंधळ शोभत नाही
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वित्तमंत्री जयंत पाटील यांच्या तोंडापर्यंत बॅनर फडकवत नेण्याचा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेला प्रकार विधानसभेला शोभादायक नाही. विरोधकांनी अशा प्रकारे गोंधळ घातला तर महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या