
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात गजानन गवळी (४५) आणि त्यांची पत्नी दीपाली गवळी (३५) या दांपत्याचा सर्व्हिस लाइनच्या तारांना लोखंडी रॉडचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला घडली. सुदैवाने या दांपत्याचा पाच वर्षांचा लावण्य नावाचा मुलगा खाली खेळत असल्याने बचावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गजानन हे रविवारी सुटी असल्याने घरगुती काम करीत होते. एक लोखंडी पाइप गॅलरीतून इतरत्र हलविताना समोरील ११०० केव्ही जिवंत वीज तारांना स्पर्श झाला आणि ते जागीच कोसळले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी दीपालीसुद्धा खेचली गेली आणि जागीच दोघेही गतप्राण झाले. मृतक हे मूळचे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील रहिवासी आहेत. ते नजीकच्या लोधीखेडा येथील पीबीएम कंपनीत नोकरीला होते तर, पत्नी दीपाली ही खासगी शाळेत नोकरी करायची. या हृदयद्रावक घटनेमुळे महावितरणविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. गॅलरीसमोरील वीजतारांची लाइन हटविण्यासाठी अनेकदा तक्रारी देण्यात आल्या होत्या. परंतु, ही बाब गांभीर्याने घेतली नाही, त्यातूनच हा अनर्थ ओढवला आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
यापूर्वी या ठिकाणी अशीच घटना घडली आहे. याबाबत महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता शरद सोनटक्के यांच्याशी संपर्क केला असता घटनास्थळावरील वीजखांब व पुरवठा इतरत्र हलविण्याचे अंदाजपत्रक सात महिन्यांपूर्वी वरिष्ठांकडे प्रलंबित असल्याची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


























































