यूट्यूबवर पाहून तयार केला बॉम्ब; कल्पना आली अंगाशी

प्रातिनिधिक फोटो

राज्याच्या उपराजधानीत एका अतिउत्साही युवकाने यूटय़ूबवरचा व्हिडीओ पाहून गावठी बॉम्ब तयार केला. मात्र तो बॉम्ब निकामी कसा करायचा हे न समजल्याने या पठ्ठय़ाची भीतीने गाळण उडाली. त्यामुळे त्याने तो बॉम्ब घेत थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. या अजब प्रकाराने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. आधीच नागपुरात काही दिवसांपूर्वी यूटय़ूब पाहून एका मुलाच्या हत्येचा कट आखल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता एका युवकाने यूटय़ूबवर पाहून बॉम्ब तयार केल्याची घटना घडल्याने पोलीस आणि नागरिक मोठय़ा चिंतेत पडले आहेत.

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल युवराज पगाडे (25) या युवकाने यूटय़ूबवर बॉम्ब तयार करण्याचा व्हिडीओ बघून एक गावठी बॉम्ब तयार केला, पण नंतर त्याला तो बॉम्ब निकामी करता न आल्याने तो घाबरला आणि तो बॉम्ब हातात घेऊन त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. तरुण हातात बॉम्ब घेऊन आल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी केला निकामी बॉम्ब

घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगरची आहे. आरोपी राहुलने पोलिसांना बॉम्बची माहिती देताच बॉम्बशोधक व नाशक पथकाला बोलावण्यात आले. पथक आल्यानंतर त्यांनी या गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट वेगळे करून बॉम्ब निकामी केल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 285, 286, 7, 25 (1) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या