
सामन प्रतिनिधी, नागपूर
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज होऊ शकले नाही. पावसामुळे विधिमंडळाचा वीजपुरवठा बंद करावा लागला होता. या घटनेची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली.
विधानसभेत कामकाजाला सुरुवात होण्यापूर्की विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या गोंधळाचा मुद्दा मांडला. विधान भवनात पाणी भरल्याने स्मार्ट सिटीचा फज्जा उडाला. त्या दिवशी कुठेही आपत्ती व्यवस्थापन दिसले नाही. पावसामुळे नागपूरमध्ये जी वाताहत झाली त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी नागपूरकरांची माफी मागावी आणि दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही या विषयावरून सरकारला धारेवर धरले. त्या दिवशी विधान भवनाचा परिसर हा जलयुक्त आवार झाला होता. पावसाळी अधिवेशनाची तयारी योग्य झाली नाही. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’वर साप आढळला. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची गाडी अडकून पडल्यामुळे त्यांना विमानतळाकर पोहचता आले नाही, असे पवार म्हणाले.
पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता कमी पडली
नागपूरमध्ये अतिवृष्टी म्हणून जास्तीत जास्त १५० मि.मी. इतका पाऊस होतो, मात्र येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता केवळ १२५ मि.मी. इतकेच पाणी वाहून नेण्याची आहे. मागील आठवडय़ात शुक्रवारी २४ तासांत २८२ मि.मी. पाऊस झाला. त्यापैकी पहिल्या अडीच तासांत २६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे नागपूर शहरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असल्यामुळे पाणी तुंबून राहिले. विधान भवन परिसर पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा बंद करावा लागला होता. तरीही अधिवेशनाच्या तयारीत जाणीवपूर्वक कुणी चूक केली असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.





























































