शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची नौटंकी, शिवसेना-भाजप आमदार भिडले

695

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्दय़ावरून पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही रडीचा डाव सुरूच ठेवला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या मदतीचा हात आखडता घेणाऱ्या भाजपने विरोधी पक्षात बसल्यावर याच मदतीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज नौटंकी केली. दै. ‘सामना’ वाचत नाही म्हणणाऱ्या विरोधकांनीच ‘सामना’मधील बातम्यांचे बॅनर विधानसभा आणि विधान परिषदेत झळकवले.  यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार भाजप आमदारांना भिडल्याने एकच रणकंदन झाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची वितरीत केलेल्या मदतीची माहिती ऐकून न घेताच भाजपची नौटंकी सुरूच राहिल्याने जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी असलेल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गोंधळात दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे केलेल्या सुमारे 15 हजार कोटींच्या मागणीपैकी एक पैसाही राज्य सरकारकडे आला नसताना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सदस्यांनी ठरवूनच गोंधळ घातला.  विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची घोषणा करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत असताना दिलेला शब्द पाळायचे. आताही त्यांनी शब्द पाळावा, असे विधान फडणवीस यांनी केले. हा विषय स्थगनच्या निकषात बसत नसल्याचे  सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षाची स्थगन प्रस्तावाची सूचना नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी बाकावरील सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना विधानसभा अध्यक्ष शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने दै. ‘सामना’चे बॅनर झळकवणाऱ्या सदस्यांची नावे लिहून घ्या, अशी ताकीद नाना पटोले यांना दिली. त्यानंतरही भाजप सदस्य हरिश पिंपळे, नारायण कुचे, अभिमन्यू पवार यांनी हातातील बॅनर उंचावत तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर घेऊन गेले. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी तो बॅनर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत शिवसेना-भाजपचे सदस्य भिडले. अखेर शिवसेना सदस्य भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यासह अन्य ज्येष्ठ सदस्यांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. विरोधी बाकावरूनही देवेंद्र फडणवीस व आशीष शेलार यांनी आपल्या सदस्यांना जागेवर जाण्यास सांगितले. या गोंधळातच तत्काळ विधानसभा अध्यक्षांनी 15 मिनिटांसाठी  सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सहा भाजप आमदारांना केले नेम

अर्थमंत्री जयंत पाटील हे सभागृहात आपले निवेदन काचत असताना गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाचे सदस्य निरंजन डावखरे, गिरीष व्यास, अनिल सोले, भाई गिरकर, सुरजितसिंह ठाकूर, रणजित पाटील यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नेम केले. बोंब मारणाऱ्या आमदारांना ताकीद देत गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले. त्यांनतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

धक्काबुक्की झाली नाही

सभागृहात होर्डिंग झळकावणे, गोंधळ घालणे हे अशोभनीय आहे. विधानसभा अध्यक्षांनी सांगून आणि कारवाई करण्याचे संकेत देऊनही भाजपच्या आमदारांनी ऐकले नाही. त्यावरून थोडा गोंधळ झाला. उगाच गोंधळ घालायचा असे चालणार नाही आणि झालेल्या प्रकाराला धक्काबुक्की झाली असे म्हणता येणार नाही, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी  प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले..

दोन्ही सभागृहांत अध्यक्ष-सभापतींकडून सदस्यांना समज

विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी तर विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना समज दिली. मुख्यमंत्री बसले असताना त्यांच्यासमोर बॅनर झळकवणे ही दुर्दैवी घटना आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून पुन्हा एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये याची नोंद घ्यावी, अशी समज अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर प्रथापरंपरेप्रमाणे सभागृहात बॅनर फडककणे, घोषणा देणे हे योग्य नसल्याची समज सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिली.

विधान परिषदेतही बॅनरबाजी

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर स्थगनची मागणी केली. यावर ऍड. अनिल परब यांनी आक्षेप घेतला. यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभापतींनी स्थगनची सूचना फेटाळताच प्रसाद लाड, गिरीष व्यास, निरंजन डावखरे, महादेव जानकर आदी सदस्यांनी  दै. सामनाचे बॅनर झळकवले. हे बॅनर हिसकावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी केला तेव्हा झोंबाझोंबी झाली. शिवसेनेच्या सदस्यांनीही विरोधी पक्षाच्या या नीतीविरोधात जोरदार घोषणा दिल्या. सभागृहात हा गोंधळ सुरू असतानाच सभापती रामराजे निंबाळकर यांनी 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब केले. त्यानंरही सभागृह सुरू झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधक आमने-सामने येत असल्याचे पाहून सभापतींनी पुन्हा 15 मिनिटांसाठी सभागृहाचे  कामकाज तहकूब केले. त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकार पक्षातर्फे विदर्भाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ऍड. अनिल परब यांच्यासह सहकाऱ्यांनी दाखल केलेल्या नियम 260 चा प्रस्ताव वाचण्याची सूचना केली. सूचना वाचत असतानाही भाजपचा गोंधळ सुरूच होता. या गोंधळातच अर्थमंत्री जयंत पाटील यांनी निवेदन सादर केले. मात्र गोंधळ सुरूच राहिल्याने उपसभापतींनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.

विरोधी पक्षनेत्यांची दिलगिरी

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्षाचे सदस्य वेलमध्ये आले तरी विरोधी पक्ष संयमाने वागेल. कोणी कोणाच्या अंगावर जाणार नाही, असे विरोधी पक्षाच्या वतीने त्यांनी आश्वासन दिले. प्रथा-परंपरेने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करू, पण सभागृहाचा सन्मान कमी होणार नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाची स्वतःची आपली भूमिका असते, पण दोन्ही बाजूकडील सदस्यांनी भूमिका समजून घेतली पाहिजे, असे आवाहनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर विधेयके मंजूर करीत विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

आपली प्रतिक्रिया द्या