नागपूर आमदार निवासच्या साफसफाईत दारूच्या बाटल्यांचा खच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान भवन आणि आमदार निवास परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच काळजी घेतली जाते. अधिवेशन काळात तर अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या या परिसराला पोलिसांच्या सुरक्षेचा गराडा असतो. असे असतानाही नागपूरमधील आमदार निवासात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे विधान भवन आणि आमदार निवासातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रविभवन, आमदार निवास परिसरात प्रवेशपत्राशिवाय कुणालाही आतमध्ये शिरू दिले जात नव्हते. अधिवेशन आटोपताच आमदार निवासाची साफसफाई करताना मात्र तेथे दारूच्या बाटल्या सापडल्या. अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून परिचित असलेल्या आमदार निवासात दारूच्या बाटल्या पोहोचतातच कशा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अधिवेशन आटोपल्यावर आमदार निवासामधील सामानाची आवराआवर सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जाते. त्यावेळी खोलीमध्ये पाण्याच्या बाटल्या, रद्दी पेपर आणि इतर काही सामान आढळून येते. सफाईच काम करणारे महिला-पुरुष ते गोळा करून घेऊन जातात. शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथील सफाई कर्मचारी खोल्यांची साफसफाई करत असताना दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारूच्या बाटल्या नेमक्या कुठल्या खोलीत सापडल्या याची माहिती नसल्याचे सफाई कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्याने सांगितले.

आमदारांच्या स्वीय सहाय्यकांवर संशय

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेले बहुसंख्य आमदार हे आमदार निवासात न थांबता तारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांचे कार्यकर्ते आणि स्वीय सहाय्यक हे आमदार निवासात वास्तव्यास होते. आमदार निवासात सापडलेल्या दारुच्या बाटल्या स्वीय सहाय्यकांनी आतमध्ये नेल्याचा संशय आहे.

z इमारत क्रमांक 3 मध्ये साफसफाई होत असताना एका प्लास्टिकच्या टबमध्ये बाटल्या जमा केल्याचे दिसले. शिवाय इमारत क्रमांक 3 च्या मागच्या भागात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्या सापडल्या.

व्यवस्थापनाचे हात वर

आमदार निवासात आमदारांव्यतिरिक्त अनेक लोक येतात. विविध वाहने याठिकाणी पार्क केली जातात. त्यामुळे कुणी दारू पिऊन येथे बाटल्या टाकल्या असण्याची शक्यता असल्याचे सांगत आमदार निवास व्यवस्थापनाने हात वर केले आहेत.