
चौदाव्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या तरुण आमदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तोंडभरून कौतुक केले. युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांचे सभागृहातील सहजपणे वागणे-बोलणे उपस्थिती उल्लेखनीय आहे. एका बाजूला प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव यांचा वारसा लाभलेला असताना मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे या अहंकाराने वागताना आजपर्यंत दिसून आले नाही. एकदम विनम्र आणि साधेपणा प्रत्येक वेळा पाहण्यास मिळाला आहे. त्याचबरोबर तीनही पक्षातील नेत्यांसोबत मिळून-मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत आहे. ही चांगली गोष्ट आदित्य यांच्याकडे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज अजित पवार यांनी पत्रकारांच्या ‘सुयोग’ निवासस्थानी संवाद साधला. त्यावेळी अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, मागील महिनाभरात अनेक वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहे. त्या बैठकांना आदित्य ठाकरेदेखील उपस्थित राहिले आहेत. या बैठकांदरम्यान आदित्यकडे पाहिल्यावर सीनियर सभासदांना आदराने बोलणे आणि तेवढाच सन्मान दिल्याचे पाहण्यास मिळाले आहे. बाळासाहेबांचा नातू असून देखील आदित्य लोकांमध्ये मिसळून वागतात, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री विषय समजून घेऊन त्यावर कृती करतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक विषय समजून घेऊन त्यावर कृती करतात. सभागृहातील कालचे त्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केलेले भाषण बघता विधिमंडळातील कामकाज आणि बोलण्याची पद्धत आत्मसात करण्यास वेळ लागेल असे मला वाटत नाही. शिवसेनाप्रमुखांचे घर ‘मातोश्री’मध्येच राजकारणाचे धडे मिळाले असल्याने त्यांना वेगळे शिकण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.





























































