
भक्तांच्या दारी दर्शन देऊन तब्बल ८३ तासांनंतर नागोठाण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ महाराज पुन्हा मंदिरात विराजमान झाले. गुरुवारी ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देवीची पालखी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि हर हर महादेवच्या जयघोषात वाजत-गाजत गावात निघाली ती तब्बल ८३ तासांनी सोमवारी रात्री ९.३० वाजता पुन्हा मंदिरात आली.
चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या नागठाण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा असतो. जोगेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र जैन, विश्वस्त दिलीपभाई टक्के, देवाचे वतनदार व मानकरी मधुकर पोवळे, राजेंद्र पोवळे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत दादकर यांच्यासह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देवीचे भक्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.
त्यांच्या हस्ते तळकांतील देवांचे मुखवटे पालखीत विराजमान करण्यात आले. त्यानंतर हर हर महादेवच्या गजरात पालखी निघाली.
उद्योगधंद्यानिमित्त बाहेर गेलेल्या नागठाणेकरांनी या उत्सवासाठी गर्दी केली होती. माहेरवाशिणींनी सर्व आळ्यांमधील घरे भक्तांनी गजबजून गेली होती. ढोलताशा पथक, गोंधळी, वारकरी संप्रदाय यांच्या वादनांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी सोहळ्याची सांगता झाल्यानंतर मंदिर ट्रस्टचे सचिव दिलीपभाई टक्के व उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत दादकर यांच्या हस्ते या उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.


























































