नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासात खेळाचे मैदान मध्यभागी ठेवा, रहिवाशांचे म्हाडाला निवेदन

दादर, नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात खेळाचे मैदान एका बाजूला नियोजित आहे. यावर येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. हे नियोजित मैदान पुनर्विकासातील सर्व इमारतींच्या मध्यभागी असावे. जेणेकरून सर्व रहिवाशांना याचा लाभ मिळेल, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

बीडीडी चाळ क्रमांक 1 व 19 अ येथील भवानी माता मंदिराजवळ एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱयांकडे हे निवेदन देण्यात आले. रहिवाशांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन म्हाडाच्या अधिकाऱयांनी दिले.

या बैठकीला शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, कालिदास कोळंबकर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ उपस्थित होते. या सर्व लोकप्रतिनिधींना रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रमुख मागण्या

– वरळीप्रमाणे नायगाव येथेही प्रत्येक घरामागे एक पार्ंकग द्यावी
– दरमहा 35 हजार रुपये भाडे द्यावे. z करारनामा द्यावा.
– भविष्यातील देखभाल खर्चासाठी प्रत्येक घरामागे पाच लाखांचा कॉर्पस फंड द्यावा.

शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली. रहिवाशांच्या मागण्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केले.

चंदनाची देवी, बुद्ध विहाराची मागणी

बीडीडी चाळ क्रमांक 1 व 19 अ च्या पटांगणात चंदनाच्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. पुनर्विकासात या मंदिराची जागा निश्चित करावी, या परिसरात मोठय़ा संख्येने आंबेडकर अनुयायी वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी पुनर्विकासात बुद्ध विहार असावे, अशी आग्रही भूमिका माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी मांडली. येथेच हनुमान मंदिर असून पुनर्विकासात त्यासाठी जागा मिळावी, अशी विनंती रहिवाशांनी केली आहे.