
नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल आला आणि एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळा रिकामी केली. बॉम्ब शोधण्यासाठी शाळेची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणतीही बॉम्बसदृश वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा ईमेल कोणी केला हे अद्यापही समजू शकले नाही.
नालासोपाराच्या श्रीप्रस्थ येथे राहुल इंटरनॅशनल शाळा आहे. याच्या शेजारी मदर मेरी इंग्लिश हायस्कूल आणि के. एल. तिवारी ज्युनिअर अॅण्ड डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स हे महाविद्यालय आहे. या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास अचानक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मेल आयडीवर शाळेत बॉम्ब ठेवला असून शाळा बॉम्बने उडवू असा निनावी ईमेल आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शाळा व्यवस्थापक व शिक्षकांनी याची माहिती नालासोपारा पोलिसांना दिली.
जीव भांड्यात पडला
वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल, नालासोपारा सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, क्राईम बँच युनिट तीनचे पथक, खंडणीविरोधी पथक, सायबर पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र यात काहीच सापडले नाही. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

























































