श्रीनामदेव महाराज, कोल्हापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक वैद्य

कुंभारगल्लीचे स्वामी श्री कृष्ण सरस्वती दत्तमहाराज यांचे शिष्य श्री नामदेव महाराज चव्हाण यांच्या अवतारकार्याचा हा पूर्वपरिचय.

प्राचीन काळापासून हिंदुस्थानात आनंद, चैतन्य, नाथ आणि स्वरूप हे चार प्रमुख संप्रदाय प्रचलित आहेत. ‘आनंद’ संप्रदायाचा भर मुख्यतः ‘अद्वैत’ सिद्धांताच्या प्रचारावर आहे. ‘विश्वमानवकल्याण’ हा या संप्रदायाचा मूळ हेतू आहे. ‘सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचे अंश असून प्राणिमात्रांची सेवा हीच परमेश्वराची सेवा’ अशी शिकवण आहे. कर्मकांड व सोवळय़ाओवळय़ाचे अवडंबर न मानणारा, धर्म-जात-लिंग-उच्च-नीच-राव-रंक यांत भेद न करणारा, भक्तिमार्गातून नामसाधनेचा पुरस्कार करणारा हा संप्रदाय सर्वसामान्यांनाही आपलासा वाटतो. श्रद्धा आणि प्रेम यांच्या बळावर भक्तीची कास धरणाऱया या संप्रदायाने आध्यात्मिक जगताला आजवर अनेक सत्पुरुष दिलेले आहेत.

याच प्रभावळीतील श्री स्वामी समर्थ व श्री कृष्ण सरस्वती ही गुरू परंपरा पुढे नेणाऱया ‘श्री नामदेव महाराज चव्हाण’ या सत्पुरुषाचा जन्म धारवाड जिह्यातील ‘मदियाळ’ या गावी झाला. श्री महाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई, थोरली लेक भागूबाई हिच्याकडे राहावयास आल्या होत्या. भागूबाईच्या सासरी त्यांचे स्वमालकीचे दत्तमंदिर होते. या मंदिर परिसरातील वड-पिंपळाच्या जोडवृक्षाशेजारी औदुंबर वृक्षाला गर्भार अवस्थेत प्रदक्षिणा घालत असताना एकाएकी प्रसववेदना होऊ लागल्याने लक्ष्मीबाई कोसळल्या आणि तिथेच प्रसूत झाल्या. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका यतीश्वराने ‘श्रीदत्त जन्मास आला आहे’ असे भाकीत वर्तवले. गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर जन्म घेणारे आणि अध्यात्मजगतासाठी दिशादर्शक ठरणारे हे बालक म्हणजेच पुढे संतपदाला पोहोचलेले सिद्ध सत्पुरुष ‘श्री नामदेव महाराज चव्हाण’.

श्री नामदेव महाराजांचे आजोबा निंबाजीपंत चव्हाण नागपूर जिह्यातील उमराशी तालुक्याचे. हे नागपूरकर भोसलेंच्या चाकरीत होते. पुढे काही कारणाने करवीर कोल्हापुरास छत्रपतींच्या पदरी नोकरी करणारे निंबाजीपंत सेवानिवृत्त झाले आणि पत्नी भीमाबाई, आठ पुत्र व एक कन्या अशा भरल्या संसारासह नरसोबावाडीनजीक ‘दत्तवाड’ या गावी स्थायिक झाले. पुढे हे घराणे ‘दत्तवाडचे इनामदार’ म्हणून प्रसिद्धीस आले. निंबाजीपंत व भीमाबाई नित्यनेमाने दर पौर्णिमेस नरसोबावाडीस जात असत. श्रीदत्तात्रेयांची उपासना आणि नामस्मरण यात सतत मग्न राहणाऱया भीमाबाईंना पुढे वाचासिद्धी लाभली. त्यांच्या दर्शनार्थ अनेक दत्तोपासक, अध्यात्म क्षेत्रातील जाणकार आणि सर्वसामान्य जणही येत असत. परमार्थासोबत प्रपंच निर्विघ्नपणे चालू होता, मात्र एकदा कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये निंबाजीपंत वाहून गेले अन् या धक्क्यातून सावरण्यासाठी चव्हाण कुटुंबीयांना बरेच श्रम व सायास घडले. या कटू प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी पुत्र व्यंकोबा यांनी प्रपंचाचा तळ ‘दत्तवाड’ येथून उठवला व कुटुंबकबिल्यासह ते आपल्या आजोळी, करवीर प्रांतातील ‘हल्याळ’ येथे आले.

ब्रिटिश फौजेच्या सेवेत असलेल्या व्यंकोबा चव्हाण यांनी विविध लढायांमधून मर्दुमकी गाजवली. पुढे युद्ध व चकमकींची धामधूम शांत झाल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी घरबांधणीची कामे घेतली. यात बऱयापैकी प्राप्त झालेल्या पैशांतून त्यांनी ‘कलादगी’ या गावी स्वतःची वास्तू बांधली. पाच मुलींच्या पाठी नामदेवाच्या रूपाने जन्मलेले तेजस्वी बालक व्यंकोबा अन् लक्ष्मीबाईच्या आयुष्याला आनंदाची झालर लावते झाले. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नामदेव चारेक वर्षांचा होईतोवर मातोश्री लक्ष्मीबाईंचे निधन झाले. आईचे छत्र हरपलेल्या, पोरक्या नामदेवला त्याच्या मोठय़ा बहिणीने, भागूताईने आपल्या घरी ‘मादियाळ’ येथे आणले. त्यांच्या दत्तमंदिरात बालपण घालविलेल्या नामदेवाचा प्रत्येक श्वास ‘दत्तमय’ झाला. एकदा भागूताईंनी नामदेवास, ‘मुरगोड’चे थोर सत्पुरुष चिदंबर दीक्षितांचे शिष्य राजाराम बुवा यांच्या दर्शनास नेले तेव्हा लहानग्या नामदेवाला प्रेमभराने जवळ घेत, स्वतःकडील पंचधातूची दत्तमूर्ती देत ते म्हणाले, ‘या मुलाला श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडेल!’ अशाच आशयाचे विधान पुढे एकदा श्री स्वामी समर्थांचे शिष्य श्री बोटे स्वामी यांनीदेखील केले.

वडील व्यंकोबा त्यांच्या परीने आईची जागा भरून काढीत होते, मात्र प्रपंचाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने व्यापारापोटी घराबाहेर पडणे त्यांना अत्यावश्यक होते. कंत्राटाच्या कामानिमित्ताने व्यंकोबा धारवाड-विजापूर येथे कायम ये-जा करीत. नामदेवाच्या मनगटात आठ तोळे सोन्याची सलकडी घालण्याइतकी उत्तम आर्थिक सुबत्ता व्यंकोबांनी राखली होती. मोठी बहीण भागूबाई हिनेदेखील नामदेवाच्या पालनपोषणात कसलीही कमतरता ठेवली नाही. नामदेवाचे शाळेत घालण्याचे वय झाल्याचे पाहून व्यंकोबांनी त्याला ‘कलादगी’स आणले. नामदेवाचे कानडी प्राथमिक शिक्षण सुरू झाले, मात्र रडतरखडत चौथीपर्यंतचे शिक्षण घेणाऱया नामदेवाचे लक्ष अभ्यासापेक्षा अध्यात्माकडेच अधिक होते. देवळात मूर्तीच्या मागे तासन्तास ध्यान-नामजप करत बसावे, भजन म्हणावे, मंदिरात कुणी साधू सत्पुरुष आल्यास त्यांचे एकटक निरीक्षण करावे यातच नामदेवाला आनंद होत असे. अशात पुढे सातेक वर्षे गेली. नामदेवाची शिक्षणाविषयीची अनास्था पाहून व्यंकोबा चिंतेत पडले. त्यातच नामदेवाने शिक्षण आणि शाळा या दोहोंसही ‘रामराम’ ठोकला. मुक्त संचार करणाऱया अन् विविध मंदिरांत जाऊन ध्यानसाधनेत मग्न राहणाऱया नामदेवाची चिंता व्यंकोबांना छळू लागली. शिक्षणात गती नसलेल्या नामदेवाने इथे-तिथे हिंडण्यापेक्षा लहानसा उद्योग करावा असा विचार करून व्यंकोबांनी त्याला एका नामांकित सुताराच्या हाताखाली काम शिकण्यास ठेवले.
नामदेव कामावर जाऊ लागला, मात्र एकेदिवशी तापट स्वभावाच्या सुताराने त्याच्याकडे नोकरीस असलेल्या एका मजुराला क्षुल्लकशा चुकीवरून मरेतोवर मारहाण केली आणि त्या घायाळ असहाय्य मजुराला तडकाफडकी कामावरून काढले. डोळय़ांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे धास्तावलेल्या नामदेवाने त्याचवेळी, ‘यापुढे आपण नोकर म्हणून काम करायचे नाही व कुणाचीही गुलामी पत्करायची नाही’ असे ठरविले आणि आपले हे ठाम मत वडिलांच्या कानावर घालून त्याने स्वतःला परमेश्वराच्या चाकरीत कायमचे बंदिस्त करून घेतले.

तीर्थक्षेत्री जाणे, सिद्ध सत्पुरुषांचे दर्शन घेणे, संतसज्जनांच्या सहवासात राहणे हे नामदेवाचे विशेष आवडते कार्य बनले. अशातच त्याचा सद्गुरूप्राप्तीचा शोध पूर्णत्वाला जाण्यास अनुकूल असलेला दिवस उगवला. ‘कलादगी’च्या घनदाट अरण्यात वास्तव्य करून असलेल्या श्री नागलिंगय्या शिवयोगी यांच्या दर्शनास नामदेव गेला. सभोवताली नागसर्पांच्या गराडय़ात बसलेल्या सिद्धयोगी श्री नागलिंगय्यांच्या निकट न घाबरता धीटपणे पोहोचलेल्या नामदेवाला त्यांनी जवळ घेतले आणि सांगितले, ‘माझ्याकडे का आलास? येथे तुझ्याकरिता काही नाही. तू कोल्हापुरास जा. साक्षात श्री दत्तमहाराज ‘श्री कृष्ण सरस्वती’ तुझी वाट पाहत आहेत. तेच तुझे ‘गुरू’ अन् तेच तुझे ‘गुरुस्थान’.
(पूर्वार्ध)

[email protected]