दारी तुझे नाम…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनोद बांदोडकर

‘समय के साथ चलते रहो, नही तो पीछे रह जाओगे’ ही म्हण सार्थ करण्याच्या प्रयत्नात अनेक जण असतात. आपले स्वतःचे छोटे का असेना, पण घर असावे ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असतेच. आपले स्वतःचे घर, दारावर आपल्या नावाची पाटी हे एक स्वप्न असले तरी ते अस्तित्वात आणण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

शहरात राहणाऱयांसाठी आपला एक छोटासा बंगला व आजूबाजूला बाग एक दिवास्वप्नच असते. आपल्या घरचा पत्ता शोधण्यासाठी सोपे जावे म्हणून ज्या खुणा सांगितल्या जातात, त्यात मंदिराच्या बाजूला, शाळेच्या बाजूला किंवा मच्छी मार्केटच्या बाजूला अशा असतात. पुन्हा बिल्डिंगमधल्या पॅसेजमध्ये लावलेल्या नावांच्या पाटीवरून ती व्यक्ती कुठल्या मजल्यावर राहते ते कळते. नवीन पाहुणा असेल तर त्याला ती पाटी बघितल्याशिवाय गत्यंतरच नसते. असो. नाहीतर वर-खाली चढउतर करावी लागेल!

घरच्या दारावर नावाची पाटी असणे हे त्या-त्या घरच्या मालकासाठी फार अभिमानाची गोष्ट असते आणि ती पाटी किती किमतीची असावी हे प्रत्येकाच्या बजेटवर किंवा त्याच्या छानछोकीवर अवलंबून असते आणि ती पाटी त्या फ्लॅटला किंवा त्या घराला शोभावी अशीच असावी लागते.

एखाद्या बंगल्यावर 2×8 इंचांची (छोटी) पाटी शोभा देणारी नसते, तसेच चाळीमधल्या रूमच्या दारावर 18×5 इंचांची (मोठी) पाटी शोभा देणारी नसते. त्या दारावरच्या पाटीवर कोणाचे नाव असावे हे त्या कुटुंबावर आधारलेले असते. काहींचा फक्त ‘आडनावा’वर जोर असतो. एकत्र कुटुंब असेल तर ते सोयीचे असते. बहुतेक वेळा जो घरचा प्रमुख असतो त्याचेच नाव असते, तर काही वेळा नवरा-बायको असतील तर श्री. व सौ. त्याच्या मागे आपापली नावे लावतात.

आलेले गिऱहाईक त्यांच्या मागणीनुसार, हव्या त्या साईज व डिझाइनमध्ये नावाची पाटी करून देणे हा त्या कामाचा कार्यभाग असतो, ज्याला ‘टेलरमेड’ नेमप्लेट म्हणू हवे तर! काहींना गणेशमूर्ती आपल्या नेमप्लेटवर हवी असते. कॅथलिक असेल तर क्रॉस किंवा येशूची प्रतिमा हवी असते. मुस्लिम असेल तर त्याला ‘786’ किंवा `KGN’ (ख्वाजा गरीब नवाज) असे लिहिलेले हवे असते. जसा धर्म तसा प्लेटवरचा रंगही बदलतो. हिरवा, केसरी, पांढरा, निळा अशा विविध रंगछटा असलेल्या पाटय़ा! ज्यांना जो रंग हवा असतो तो रंग त्या नावाच्या पाटीवर पाहिजे असतो, तसा तो देण्याचा प्रयत्न असतो. ‘एसआरए’मध्ये ज्या जुन्या चाळी तोडून जिथे नवीन इमारत बांधण्यात येते तेथील सर्वसाधारण लो-इन्कम ग्रुपमधील रहिवाशांना कमी किमतीच्या साध्या नावाची पाटी लावण्यात रस असतो. आपले नाव ठळक दिसते ना, एवढेच ते पाहतात. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये जिथे टॉवर उभे असतात. त्यांच्या लॉबीमधील प्लेट या मोठय़ा असतात याचे कारण त्यांची नावे फार मोठी असतात. साधारण 18×2 इंच आकाराच्या त्या प्लेट असतात. नावाच्या प्लेटवरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कळत असते. नावाच्या खाली असलेल्या त्याच्या डिग्र्या पाहून ते कळते. उदा. डॉ., ऍड., इंजि. इत्यादी.

नावाची प्लेट बनवताना गिऱहाईकाकडून स्पष्ट नाव लिहून घ्यावे लागते. अनेक वेळा नावात चुका होतात. उदा. मेधा (Mheda), मेघा (Megheda). ‘ध’ आणि ‘घ’मध्ये जरा चुकले तर ती प्लेट बाद होऊ शकते. ती बनवण्याअगोदर काळजी घ्यावी लागते.

नावाच्या साध्या स्टिकरपासून स्टील, ब्रास, ऍक्रॅलिक, लाकडी तसेच इचिंग, एन्ग्रेव्हिंगची नावे कटिंग करून प्लेटवर लावणे, लाकडी प्लेटवर नावे कोरून त्यावर लॅमिनेट करणे, वेगवेगळ्या साईजमध्ये अब्स्ट्रक्ट डिझाइनमध्ये नाव कोरणे, कोणता रंग दिल्याने त्या प्लेटला उठाव येईल ते पाहणे व शेवटी गिऱहाईकाचे समाधान होणे हे फार महत्त्वाचे असते. ब्रासमध्ये लेटर कट करून त्याला सोन्याचा मुलामा देऊन ते लाकडी प्लेटवर पेस्ट करणे, त्याची अलाईनमेंट पाहणे, पुन्हा त्याला लॅमिनेट करणे, जेणेकरून त्या प्लेटला वेगळाच लुक येईल हे पाहणे. तसे हे जिकिरीचेच काम असते. कधीतरी त्यात आपले नुकसानही होते. हा सर्व त्या व्यवसायाचा भाग असतो.

घराच्या प्लेट बनवताना जरा काळजी घ्यावी लागते ती फ्लॅटचा नंबर जर एखाद्या प्लेटवर असेल व मागेपुढे एखाद्याला आपला फ्लॅट बदलायचा असेल तर ती प्लेट बाद होऊ शकते. कारण ती दुसऱया ठिकाणी वापरता येत नाही, त्या प्लेटवर जुन्या फ्लॅटचा नंबर असतो म्हणून. कायमस्वरूपी तिथे राहत असाल तर काही प्रश्न नाही.

हल्ली वास्तुशास्त्राप्रमाणे काही ठिकाणी देवदार लाकडाचा उपयोग केला जातो. कारण त्या लाकडांना वाळवीचा प्रादुर्भाव होत नसतो. स्टील इचिंग केलेल्या प्लेट या वर्षानुवर्षे टिकतात, त्या सहसा खराब होत नाहीत आणि त्यांना मेन्टेनन्ससुद्धा कमी असतो. फॅन्सी प्लेट उदा. लाकडावर केलेले कोरीवकाम काही वर्षांनी खराब होऊ शकते. दर तीन-चार वर्षांनी प्लेट बनविणाऱयांसाठीची गोष्ट वेगळी असते. काचेवर इचिंग करून त्याला साजेसा रंग देऊन त्यांच्या कडा बेवलिंग, पॉलिश केल्यावर त्या प्लेट फारच सुंदर व आकर्षक दिसतात. त्या प्लेटला थोडी उंची देऊन दोन्ही बाजूला स्टड लावले तर त्या प्लेट फार उठावदार आणि वेगळी उंची असलेल्या दिसतात. साधारण या प्लेट बंगल्यावर लावल्या जातात आणि त्या बंगल्याची शान आणखीच निखरून येते. पाठीमागून लाईट (LED) लावली तर ती रात्रीही चमकते. त्याला खर्चदेखील तेवढाच असतो.

दारावर नेमप्लेट असणे, त्यावर घरचा नंबर असणे पुष्कळच गरजेचे आहे. बाजूबाजूला असणाऱया फ्लॅटची बेल वाजवली तर तो त्रासदायक होऊ शकतो. फ्लॅट नंबर जरी त्या नावाच्या प्लेटवर नसला तरी तो वेगळा असावा आणि ठळक असावा, जेणेकरून दुसऱयाची बेल वाजवली जाणार नाही यासाठीची ही काळजी. साधारण 15-20 वर्षांपूर्वी नेमप्लेट चित्रकाराकडून बनवून घेतल्या जात असत, पण आता संगणक आल्यापासून हे काम सोपे झाले, त्या प्लेटचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्या अधिक सुंदर, मनमोहक व टिकाऊ झाल्या आहेत. त्यासाठी आपल्याला पाहिजे तो डिझाइनचा फॉन्ट व त्याची साईज गिऱहाईकाच्या मागणीनुसार देता येतो. म्हणूनच ‘समय के साथ चलते रहो…’ ही म्हण नेमप्लेटलाही सार्थ होते.

जुन्या जमान्यातील साधारण 100-150 वर्षांच्या प्लेट अजूनही शाबूत आहेत. शिशावर ओतीवकाम केलेल्या प्लेट माझ्या पाहणीत आहेत. त्या काळातील हाताने, कुंचल्याने प्लेट बनविणाऱया त्या कारागीरांना सलाम! काळानुसार बदल हा होणारच…