
मीरा-भाईंदर शहरातील मतदारांची नावे वगळून ती चक्क ठाणे महापालिकेच्या मतदार यादीत घुसवली आहेत. काशिमीरा प्रभाग १४ मधील चेनापाडा, काजूपाडा, माशाचा पाडा परिसरातील नावे थेट ठाणे महानगरपालिकेच्या यादीत आहेत. ही नावे गायमुख येथील त्रिमूर्ती शाळेच्या बूथवर नोंदवली आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत असलेली नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आल्याने निवडणूक विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या वापरल्या जात आहेत. त्या मतदार याद्यांवर मुळात घोटाळ्याच्या तक्रारी असताना त्याच सदोष याद्यांचा वापर मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी केला जात आहे. मात्र प्रारूप मतदार यादीतील प्रचंड घोळ अंतिम यादीतदेखील सुधारण्यात आलेला नाही. उलट अंतिम यादीत तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी परिस्थिती आहे. प्रारूप मतदार यादीत त्या प्रभागात असलेली नावे अंतिम मतदार यादीत मात्र वगळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे एकाच प्रभागातील चार ते पाच हजार मतदार दुसऱ्या प्रभागात दाखवण्यात आले आहेत. सदोष अंतिम यादीमुळे महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड उठत आहे.
मतदानासाठी १५ किमीची पायपीट
मीरा-भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक २४ मधील पाली डोंगरी-तारोडी भागातील मतदारांची नावे १२ ते १५ किलोमीटर दूरवरच्या प्रभाग २ मध्ये भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क परिसरात टाकण्यात आली आहेत, तर प्रभाग ९ मधील मतदारांची नावे प्रभाग १९ व २२ मध्ये टाकण्यात आली आहेत. प्रभाग ९ मधील मतदारांची नावे शांती पार्क परिसरातील यादीत आहेत. इंद्रलोक-पूजापार्क आदी प्रभाग १२ मधील तसेच प्रभाग १४ काशिमीरा आणि प्रभाग १३ हटकेशमधील मतदारांची नावे मीरा रोडच्या प्रभाग १८ मध्ये टाकण्यात आली आहेत.
प्रशासन भाजपच्या दबावाखाली
अंतिम मतदार यादीतील या घोळानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा संघटक नीलम ढवण, ज्योती शेवंते तर मनसेचे हेमंत सावंत, सचिन पोपळे आदींनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी प्रारूप मतदार यादीतील घोळ आणि अंतिम यादीतील घोळ हा भाजपच्या दबावाखाली पालिका प्रशासनाने केल्याचा आरोप केला.
































































