मुलाखत – युगूल गीतांची पहिली चाहूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • नमिता वारणकर

संगीताच्या भावविश्वातला ‘शुक्रतारा’ अर्थात ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या मुलायम आणि सुमधुर आवाजाने सजलेलं ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी…चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी…’ हे प्रियकर-प्रेयसीच्या नात्याची वीण हळुवार उलगडणारं युगुलगीत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील ‘त्या’ खास आठवणींना वाट मोकळी करून देणारं हे गाणं अजरामर करण्याचं श्रेय जातं भावगीत गायक अरुण दाते, कवी मंगेश पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे या ज्येष्ठ कलाकारांना. आकाशवाणीवर 1962 साली ध्वनिमुद्रित झालेल्या गीताने या वर्षी 60व्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्त सध्या मुंबई, महाराष्ट्र, गोवा आणि हिंदुस्थानात विविध ठिकाणी ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम सादर होत आहे. भावगीताची गोडी चिरकाल टिकणाऱ्या आणि रसिकांच्या ह्रदयात कायम रुंजी घालणाऱ्या या गाण्याच्या सुरेल आणि अजरामर प्रवासाविषयी ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्याशी साधलेला संवाद…

‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी…’ हे युगुलगीत 60व्या वर्षात पदार्पण करत आहे. काय भावना व्यक्त कराल?

– या गाण्याला 60 वर्षे झाली यावर विश्वासच बसत नाही. हे गाणं बाबांनी जेवढय़ा वेळा म्हटलं किंवा अनेक गायक कलाकार वेगवेगळय़ा भावसंगीताच्या कार्यक्रमात गातात, तसेच ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमातून गायक मंदार आपटे आणि श्रीरंग भावे यांनी 53 वेळा गायलंय. अजूनही गात आहेत. याला इतकी वर्षं झाली हे खरंच वाटत नाही. नेहमी असं वाटतं की, हे काही महिन्यांपूर्वी तयार झालेलं हे ताजं गाणं आहे. प्रत्येक पिढीला ते आपलं ‘प्रेमगीत’ वाटत आलंय. या गाण्याचं वैशिष्टय़ सांगायचं तर,  मराठी भावसंगीतात इतपं प्रसिद्ध भावगीत दुसरं कुठलं असेल असं वाटत नाही.

अशी अनेक भावगीतं अरुण दाते यांनी अजरामर केली आहेत. हे यश नेमकं कुणाचं असं तुम्हाला वाटतं?

– मला नेहमीच असं वाटतं की, हे यश बाबांचं आहेच, पण बाबासुद्धा ज्यांना आदरार्थी मानायचे अशा सगळय़ा कवी, संगीतकाराचं पहिलं आहे. बाबांना वन्समोअर मिळाले, गाण्याला दाद मिळाली की ते नेहमी म्हणायचे की, तुमच्या या सगळय़ा टाळय़ा, सगळी दाद मी माझ्या संगीतकारांपर्यंत आणि कवींपर्यंत पोहोचवेन; कारण खरं सगळं श्रेय त्यांचं आहे. चाल न बिघडवता, गाणं न बिघडवता हे गाणं तुमच्यापर्यंत आणणं एवढंच फक्त मी केलंय. ते मनाने एवढे मोठे होते की, गाण्याच्या यशाचं श्रेय त्यांनी कधीच स्वतःकडे घेतलं नाही. या गाण्याचे संगीत संयोजक अनिल मोहिले यांनी बाबांबद्दल एक वाक्य म्हटलं होतं, ते इथे चपखल बसतं. ते म्हणाले होते की, “अरु भैया हे फक्त गाण्याचे गायक नव्हते, तर ते
नायक होते.’’

या गाण्याबाबत असलेली एखादी अविस्मरणीय आठवण?  

– अनिल मोहिलेकाकांच्या आयुष्यातलं ‘शुक्रतारा मंद वारा…’ हे संगीत संयोजक म्हणून पहिलं गाणं. बाबांचंही पहिलं मराठी गाणं होतं. त्यानंतर श्रीनिवास खळे आणि मंगेश पाडगावकर जोडीचं हे पहिलं प्रसिद्ध गाणं होतं. त्यांनी याआधी गाणी केली होती, पण ज्या गाण्याला विशेष प्रसिद्धी लाभली त्यातलं हे पहिलं गाणं होतं. मोहिलेकाकांनी मला याविषयी सांगितलं होतं की, ‘‘आपण जी चाल इतकी वर्षं ऐकतोय ती गाण्याची कितवी चाल होती?’’  मला एकदम प्रश्नच पडला.  ‘‘कितवी चाल म्हणजे?’’  यावर त्यांनी उत्तर दिलं की, “खळे काकांनी या गाण्याला बांधलेली ही अकरावी चाल होती. याआधीच्या दहाही चाली त्यांनी स्वतः तयार केल्या आणि रिजेक्टही केल्या. त्यानंतर अकरावी चाल जेव्हा तयार झाली तेव्हा ते म्हणाले की, आता मी ज्या मुलासाठी (ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते) हे गाणं बनवलंय ते मला जसं हवं तसं झालंय.’’ तसेच बाबांना अरुण दाते हे नाव या गाण्यामुळेच मिळालं.

‘शुक्रतारा ते नवा शुक्रतारा’ या प्रवासाविषयी वाचकांना काय सांगाल?

– आज ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रम होतोय याचं सगळं श्रेय त्यांचं, त्यांच्या सगळय़ा संगीतकारांचं आणि कवींचं आहे असं मी मानतो. तो आम्ही फक्त पुढे ‘नवा शुक्रतारा’ या नावाने सुरू ठेवलाय. त्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त नव्या कार्यक्रमात  रेकार्ंडगचे किस्से, पु.ल. देशपांडे, पाडगावकर, खळे, देव, मंगेशकर अशा अनेक ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कलाकारांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही प्रेक्षकांना सांगतो. प्रेक्षकांनाही हा प्रकार फार आवडतो. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बंगळुरूच्या कार्यक्रमात तर मला इतकी चांगली दाद मिळाली. कार्यक्रमाला आलेले आजी-आजोबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की, ‘आम्ही दाते साहेबांचे दोन-तीन कार्यक्रम आयुष्यात ऐकले. आम्ही पुण्याहून बंगळुरूला मुलाकडे आल्यावर त्याला सांगितलं की, ‘नवा शुक्रतारा’ हा दातेसाहेबांच्या गाण्यांचा कार्यक्रम आज आहे. आम्हाला जायचंय. मुलगा आम्हाला कार्यक्रमाला सोडून गेला. आता त्याला घरी जाऊन सांगणार आहोत की, आम्ही जन्मभर दातेसाहेबांचं गाणं ऐकलं आणि आज आम्ही अतुल दातेला ऐकलं हेही सांगू शकतो.

गाण्याला साठी लागलीय त्यानिमित्त काय नवे संकल्प केले आहेत?

– साठीनिमित्त अनेक कार्यक्रम होत आहेत.  गणपतीमध्ये मुंबई, कोलकाता, हैदराबाद अशा ठिकाणी लोकांनी बोलवलं आहे. जयपूर, नोएडा जिथे कुठे मराठी कार्यक्रम ऐकायला मिळत नाहीत त्या मंडळांनी आम्हाला बोलवलंय. चेन्नई, जयपूर नोएडा येथे बाबांचे कार्यक्रम कधीही झाले नाहीत. मी ध्यास धरलाय की, पुढच्या पिढीपर्यंत आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत भावसंगीत न्यावं. आज बाबा नसले तरीही कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत हे महत्त्वाचं आहे. 53 कार्यक्रमांपैकी किमान 45 कार्यक्रमांना आम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालं. तेव्हा मला भरून आलं. कधी कधी लोकांनी उभं राहून 5-5 मिनिटं टाळय़ा वाजवल्या आहेत. जेव्हा रसिक प्रेक्षक उभं राहून टाळय़ा वाजवतात, ही दाद माझ्या वडिलांना जाते. त्यावेळी आमचे कलाकार रसिक प्रेक्षकांना नमस्कार करतात आणि मी बाबांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो की, हे सगळं तुमच्यामुळेच झालंय!