नमो अॅपद्वारे मोदींचा सर्व्हे, भाजप खासदारांच्या पोटात गोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भाजपने सुरू केलेल्या नमो अॅपद्वारे एक सर्वेक्षण घेतले जात आहे. या सर्वेक्षणामुळे भाजपचे खासदार चांगलेच घाबरले असल्याचे सांगण्यात येत आहे. पीपल्स पल्स नावाने हे सर्वेक्षण घेण्यात येत असून यामध्ये तुमच्या मतदारसंघातील तीन प्रभावशाली नेत्यांची नावे सांगा असा प्रश्न विचारण्यात आला आहे. खासदारांसाठी चिंतेची बाब ही आहे की या सर्व्हेचा वापर 2019 च्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी केला जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना या अॅपचा वापर करून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केलं होतं. या अॅपद्वारे घेण्यात येत असलेल्या सर्व्हेत सहभागी होण्यासाठी मोदींचा एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला असून या व्हिडीओद्वारे त्यांनी मतदारांना सर्व्हेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तुमची मते हे माझ्यासाठी महत्वाची असून या सर्व्हेमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी व्हायला सांगा असं मोदी यांनी एका व्हिडिओद्वारे आवाहन केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील या सर्व्हेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे सर्वाधिक खासदार हे हिंदी भाषिक राज्यांमधून म्हणजेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधून निवडून आलेले आहे. उत्तर प्रदेशातील 2017 च्या निवडणुकांनंतर या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालेले नाहीये. या सर्व्हेमध्ये भाजपविरोधी आघाडीमुळे तुमच्या भागात काही फरक पडेल काय ? असा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य, कृषी, भ्रष्टाचार, स्वच्छ भारत, राष्ट्रीय सुरक्षा, रोजगार, वीज, अर्थव्यवस्था अशा मुद्दावर प्रश्न विचारण्यात आले आहेत.