
सामना प्रतिनिधी । मुंबई
दहा वर्षांपूर्वी मी तनुश्रीच्या आरोपांना उत्तरे दिली होती. जो झूठ है वो झूठ ही है, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर यांनी तनुश्रीला फटकारले असून तिच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘हाऊसफुल 4’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईला परतलेल्या नाना पाटेकर यांना वार्ताहरांनी शनिवारी मुंबई विमानतळावरच घेरले. त्यावेळी पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. अशा प्रकारे तिने वाद उकरून काढल्याच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांनी जोधपूर येथे पाटेकर यांना याबाबत प्रश्न विचारले होते. त्यावेळी पाटेकर यांनी याप्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ते मुंबईत परतल्यानंतर वार्ताहरांनी पाटेकर यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत विचारले असता पाटेकर यांनी याबाबत नंतर सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले. वार्ताहरांनी पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता पाटेकर यांनी 8 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. दरम्यान, नाना पाटेकर यांनी तनुश्रीला याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे.






























































