घरबसल्या मतदान करू द्या! नाना पाटेकर यांची मागणी

1329

अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणूक, मतदान आणि राजकीय पक्षांविषयी परखड मत व्यक्त केले आहे. ‘दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह फारसा दिसला नाही. लोकशाहीसाठी हे चांगले नसून सरकारने मतदान करण्याची सक्ती करायली हवी तसेच घरबसल्या मतदान करण्याची व्यवस्था करता येईल का, हेदेखील पहायला हवे, असे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले. दादर येथील मतदान केंद्राबाहेर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते.

सरकारने मतदानाची सक्ती करायला हवी, पण त्याचबरोबर घरात बसून मतदान करण्याची सोयदेखील करून द्यावी. त्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे का, हे मला माहीत नाही, असे नाना पाटेकर पुढे म्हणाले. राज्यातील दिग्गज नेत्यांसह सेलिब्रेटिंनीही विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांची फारशी गर्दी नव्हती. हे चित्र त्यांना खटकले. मतदानासाठी निरुत्साह हे चांगले नसून मतदान करण्याची सक्ती केल्यानंतरच तुम्ही मतदान करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रचाराची पद्धत न पटण्यासारखी
राजकीय पक्षांच्या प्रचाराची पद्धत न पटण्यासारखी आहे, असे यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितले. उमेदवाराने चांगले काम केले असेल तर लोक नक्कीच मत देतील. त्यासाठी प्रचार कशाला हवा, असे ते म्हणाले. एकमेकांवर चिखलफेक करणाऱया उमेदवारांचीही नानांनी कानउघाडणी केली. एकमेकांना व्यासपीठावरून शिवीगाळ करणे, उणीदुणी काढणे पटत नाही. प्रचार बंद झाला तर निवडणुकीसाठी होणारा खर्चही कमी होईल. तुम्ही फक्त उमेदवारी घोषित करा, असेही नाना यांनी स्पष्ट केले.

तर निवडणूक आयोगच प्रसिद्धी करेल
उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम भरली तर आयोगच सर्व उमेदवारांनी एकसारखीच प्रसिद्धी करेल. त्यामुळे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रचारासाठी केलेला खर्च भरून काढण्यासाठी भ्रष्टाचार करणार नाही, असेही नाना यांनी सांगितले.

सुरक्षित भविष्यासाठी मतदान
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. ‘वयाच्या 94 व्या वर्षीसुद्धा नागरिक मतदानाला येतात. तरुण मतदारांनी निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, असे सचिन म्हणाला.

मतदान न करणारे ‘इडियट’
गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदान न करणाऱया लोकांना ‘इडियट’ असे म्हटले आहे. त्यांनी पत्नी शबाना आझमीसोबत मतदानाचा हक्क बजावला. लोकांना मतदानासाठी आवाहन करताना त्यांनी ग्रीक भाषेत मतदान न करणाऱयांना ‘इडियट’ असे संबोधतात असा चिमटाही काढला.

आपली प्रतिक्रिया द्या