भाजपची माघार, विधानसभाध्यक्षपदी महाराष्ट्र विकास आघाडीचे नाना पटोले

376

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकल्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला होता, तर भाजपच्या वतीने किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला होता. आघाडी सरकारने शनिवारी सरकार स्थापनेसाठी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सोमवारीच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती, तर अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाराष्ट्र विकास आघाडीने रणनीती आखली होती. तसा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता होती. पण त्यापूर्वी भाजपचे किसन कथोरे यांनी सकाळीची आपला अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची घोषणा केली. पटोले यांच्या नावाची घोषणा होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयंत पाटील, भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सन्मानपूर्वक अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेत विराजमान केले. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबू आझमी, बच्चू कडू आदींची भाषणे झाली.

शोषित-वंचित-पीडित घटकांना दिलासा देणार – पटोले

चौदाव्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे. माझी या पदासाठी बिनविरोध निवड करून चांगली परंपरा कायम ठेवल्याबद्दल मी या सदनाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना पटोले यांनी अभिनंदनपर भाषणावर बोलताना व्यक्त केली. मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत शेतकरी बांधवांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संसदीय लोकशाहीतील या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना बळीराजाचे हितसंरक्षण आणि त्याबरोबरीने समाजातील शोषित-वंचित-पीडित घटकांना दिलासा देणे हेच माझ्यासमोरील उद्दिष्ट असेल. सभागृह कामकाजाचा बहुमोल वेळ आपण सर्व सन्माननीय सदस्य याच उद्दिष्टपूर्तीसाठी खर्च करू आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे आश्वासन नाना पटोले यांनी यावेळी सभागृहाला दिले.

व्यंगाचा अभिमान

मंत्री जयंत पाटील नाना पटोले यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, यापूर्वी नाना म्हणजे हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते. एक नाना जाऊन आता दुसरे नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी आले. पण या खुर्चीचा एक गुण आहे. या खुर्चीवर बसले तर डाव्या बाजूने ऐकायला येत नाही. हा खुर्चीचा गुण आहे. पण अध्यक्षांनी डाव्या बाजूला अधिक लक्ष द्यायला पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर हरिभाऊ बागडे अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करायला उभे राहिले तेव्हा ते छातीवर हात मारत या व्यंगाचा मला अभिमान आहे असे सांगितले. आणीबाणीच्या काळात हे व्यंग आल्याचे सांगून ते म्हणाले, त्या काळात आणीबाणीच्या विरोधात आम्ही झोकून काम केले. कडाक्याच्या थंडीत मोटरसायकलवरून फिरलो तेव्हा कानाच्या नसा फाटल्या. आतापर्यंत मी ही बाब कोणाला सांगितली नव्हती, पण या व्यंगाचा अभिमान असल्याचे बागडे म्हणाले तेव्हा सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली.

शेतकरीपुत्र विधानसभाध्यक्ष झाल्याचा आनंद – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचा शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. नाना पटोले हे बंडखोर स्वभावाचे आहेत. अन्याय सहन न करणारे आहेत. आपले मत मांडताना कोणाचीही पर्वा करायची नाही असे धाडस दाखवणारा हा शेतकरीपुत्र आहे. सर्व परिस्थितीवर मात करीत तुम्ही इथपर्यंत आला आहात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या