
महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. या प्रकारावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागत असून, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका पटोले यांनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजपमध्ये एक गट सक्रिय झाल्याचा दावा पटोले यांनी केला.
नागपुरात पत्रकारांसोबत बोलताना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने सुरुवातीला बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता ‘यू-टर्न’ घेतला आहे. 68 ते 70 जागांवर ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या त्यामागे सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, अशी टीकाही पटोले यांनी आयोगावर केली.
विधानसभा अध्यक्ष बदलण्याची मागणी
विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. जनतेचा आवाज दाबला जाऊ नये याची काळजी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायची असते. बाहेर वावरत असताना राजकीय वक्तव्य करता येत नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना बदलून संवैधानिक पदाचा मान राखणाऱ्या व्यक्तीला या पदावर बसवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
मुनगंटीवार यांच्या मनात काय?
भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोठा गट सक्रिय झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात काय आहे आणि ते काय करत आहेत, हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक आहे. भाजपमध्ये भविष्यात मोठा राजकीय स्फोट होईल, असे म्हणत पटोले यांनी सूचक इशारा दिला.




























































