
अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुढील 10-15 वर्षांत पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तोच अजेंडा आहे. केंद्रात संघाच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने देश तोडून अखंड हिंदुस्थान कसा साकार होईल, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड हिंदुस्थानबाबत केलेल्या विधानाचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. ते म्हणाले भागवत यांच्या या विधानाचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण संघाची विचारधारा तोडणारी आहे यातूनच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जाते. त्यासाठी सातत्याने धर्माधर्मात वाद निर्माण करणारे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्रात त्यांच्याच विचारांचे सरकार असल्याने समाजात विद्वेष पसरवणाऱया घटनांना बळ मिळत आहे. परंतु अखंड हिंदुस्थानचे स्वप्न बाळगणाऱया संघाचे या अखंड हिंदुस्थानचे व्हिजन काय? अखंड हिंदुस्थानात कोणत्या कोणत्या धर्माला, जातींना स्थान असेल हे स्पष्ट करायला हवे, असे नाना पाटोले म्हणाले.
धार्मिक तेढ निर्माण करू नये
मशिदीवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचे काम करत आहेत. सर्वच धर्मामध्ये लाऊडस्पीकर वापरला जात असताना एकाच धर्माला टार्गेट का केले जात आहे? संविधान कोणत्याही धर्माचा द्वेष करायला सांगत नाही. धर्माच्या ठेकेदारांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाच्या प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणीही असले तरी धार्मिक तेढ निर्माण करणाऱयांवर कारवाई करायला पाहिजे, असे पटोले म्हणाले.
राहुल गांधी लवकरच मुंबईत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱयाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मुंबई दौऱयात ते पक्षाचे आमदार, मंत्री व पदाधिकाऱयांना भेटतील. महाराष्ट्रातील किमान समान कार्यक्रम, महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाच्या दृष्टीने राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असेल, असे ते म्हणाले.





























































