
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. मात्र जशा निवडणुका जवळ येतील तसे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. हे आम्हाला नवीन नाही. ही संभाव्य भीती आम्हा सगळय़ांच्या लक्षात आली असून भाजपला आम्ही योग्य उत्तर देऊ, असेही पटोले यांनी ठणकावून सांगितले.
कल्याण, डोंबिवलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, या देशातील भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने करून ठेवले आहे. जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत त्या सर्वांना ईडी व सीबीआयचा धाक दाखवून भाजपमध्ये एकत्र आणले आहे. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान झाले तर या सगळय़ांना तुरुंगात टाकायला सोपे जाईल. काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी भक्कम असून भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


























































