
सामना प्रतिनिधी, मुंबई
नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे रिफायनरी परिसरातील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे राजपत्र सरकारकडून काढण्यात यावे या मागणीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून प्रकल्प रद्द करण्याविषयीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन नाणारवासीयांना दिले.
नाणारवासीयांचा विरोध असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिले. याबाबत उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी नाणारवासीयांचे शिष्टमंडळ आज ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम, जैतापूर अणुऊर्जाविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण, नितीन जठार, गिरीश मुंडे आदींसह आलेल्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी नाणारवासीयांच्या सातबारावर जमीन अधिग्रहित केल्याचे स्टॅम्प असून यामुळे येथील फळ बागायतदारांना कर्ज मिळत नसल्याची बाब उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली. त्याचप्रमाणे हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असली तरी याविषयीचे लेखी राजपत्र काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून हा प्रकल्प रद्द करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. येत्या मंत्रिमंडळ बैठकीतच याविषयीच्या तांत्रिक मुद्दय़ांवर चर्चा होऊन प्रकल्प रद्द केला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्याची माहिती अशोक वालम, नितीन जठार यांनी दिली.






















































