
कोरोनाला रोखायचे तर गर्दी नकोच, या हेतून पोलिसांनी शीख धर्मीयांच्या पारंपरिक हल्लामहल्ला मिरवणुकीला परवानगी नाकारली. मात्र काही माथेफिरू तरुणांनी थेट पोलिसांवरच तलवार ’हल्ला’ केला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तर आहेच, पण प्रचंड संतापही आहे. पोलिसांनी आता शोधमोहीम सुरू केली असून 300 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि 18 जणांना ताब्यात घेतले आहे.
काय घडले सोमवारी संध्याकाळी…
नांदेड येथे होळीच्या निमित्ताने शीख धर्मियांच्या वतीने पारंपरिक हल्लामहल्ला मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या मिरवणूकीला परवानगी नाकारली. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी गुरुद्वाऱयातच पारंपरिक पद्धतीने हल्लामहल्ला पार पडला. या कार्यक्रमासाठी जमलेल्या जमावाने दसऱयाला न्यायालयाच्या परवानगीने हल्लामहल्ला मिरवणूक काढण्यात आली होती. मग आताच का नाही असा सवाल करून मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला. मात्र संतमंडळींनी त्यास नकार दिला.
मिरवणूकीची मागणी करणाऱया तरुणांनी गुरुद्वाऱयाचे बंद करण्यात आलेले गेट तोडून रस्त्यावर धाव घेतली. हिंगोली गेटकडे निघालेला हा जत्था अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यामुळे बिथरलेल्या जमावाने पोलिसांनाच निशाणा बनवले.
पांडे यांनी वार अंगावर झेलला
काही जण तलवारी परजून पोलिसांच्या अंगावर धावून गेले. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या अंगावर तलवारीचा वार करण्यात आला. मात्र त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी तो आपल्या अंगावर झेलला. तलवारीने त्यांची पाठ चिरून काढली. पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
संतप्त जमावाने पोलिसांच्या 12 गाडय़ांची नासधूस केली. जमावाच्या मारहाणीत पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस अंमलदार दिनेश पांडे, अजय यादव हे जखमी झाले. तर अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कवाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले हे थोडक्यात बचावले.






























































