
विजय जोशी । नांदेड
नांदेड पोलिसांनी उघडकीस आणलेल्या धान्य घोटाळ्यातील व्याप्ती अन्य जिल्ह्यात देखील असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दोन वर्ग १ चे अधिकारी, काही शासकीय कर्मचारी आणि गोदामपाल यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करावी लागेल, असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे.
१८ जुलै रोजी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी तब्बल पंधरा दिवस रेकी करुन तसेच गोदाम परिसरात, टोलनाक्यावर तसेच जेथे अन्नधान्य पोहोचते तेथील कारखान्यावर निरीक्षणासाठी आपली माणसे वेगळ्या वेषात ठेवली होती. काही मंडळींचे फोन देखील टॅप करण्यासाठी पोलीस यंत्रणेने त्याकाळात पुढाकार घेतल्याचे समजते. यासंदर्भातील पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू आणि तांदूळ जप्त केले होते. यानंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना पत्र देऊन याची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात, उपलब्ध असलेल्या पुराव्यात, तसेच सीसीटीव्ही फुटेज यामधून या सबंध प्रकरणात नांदेडजवळील कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील अनाज कंपनीसह नांदेड, जालना, परभणी, अकोला आणि लातूर येथील कंपन्यांची नावे देखील या अहवालात नमुद असून, या नावाबद्दल मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे.
सर्व बायोमॅट्रिक आणि जीपीआरएस पध्दती असताना वाहतूक ठेकेदार, गोदामपाल, काही शासकीय कर्मचारी तसेच वर्ग १ चे दोन अधिकारी यांनी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने हा सर्व घोटाळा केला असून, अन्य जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील काही कारखान्यांच्या तपासणीनंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत गोरगरीबांसाठी आलेला गहू वेगवेगळ्या कारखान्यात जातो, त्यावर प्रक्रिया केली जाते व त्यातून मोठा नफा कमविला जातो असे हे रॅकेट आहे. ज्या कंपनीमध्ये हे धान्य गेले होते, त्यात सर्वसामान्य शेतकर्यांकडून धान्य खरेदी करायचे आणि त्यावर प्रक्रिया करुन त्याची विक्री करायची असा कंपनीचा नियम होता. मात्र शासनाकडून अनुदान घेऊन नियमांविरुध्द काम करणे आणि शासनाची फसवणूक करणे या सर्व बाबी संगनमतरित्या झाल्या, असाही अहवाल पोलिसांनी दिला आहे.
नांदेडच्या नवामोंढा आणि जुनामोंढ्यातील आणखी काही हितसंबंधीय या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता वर्तविली जात असून, रोखपालांच्या खात्यात जे ८० लाख रुपये देण्यात आले त्याचेही गौडबंगाल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एकंदरच अत्यंत संतापजनक असलेला हा अहवाल आता शासनापर्यंत पोहचला असून, जवळपास पोलीस तपासात दोनशे ते अडीचशे पाने तयार झाल्याने आणि सज्जड पुरावे असल्यामुळे यात अनेकांना अटक होण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस यंत्रणेने वर्ग-१ च्या, वर्ग-२ च्या अधिकार्यांना अटक करणे सोयीस्कर व्हावे यासाठी या प्रकरणाचा तपास देखील आयपीएस दर्जाच्या नुरुल हसन या अधिकार्याकडे दिला आहे.






























































